खडकवासला : २११ खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून श्री अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
निवडणूक खर्च निरीक्षक अमित कुमार यांनी गुरुवारी (दि.२४) खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या सिंहगड टेक्निकल कॉलेज, आंबेगाव बुद्रुक येथील कार्यालयास भेट दिली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत निरीक्षकांनी कार्यालयातील प्रत्येक कक्षाच्या विधानसभा निवडणूक कामकाजा बद्दल आणि कार्यपद्धतीबाबत माहिती घेतली. निवडणूक प्रक्रिया ही मुक्त व निष्पक्षपणे होण्याच्या दृष्टीने माननीय निवडणूक खर्च निरीक्षक यांनी सर्व पथकांचा आढावा घेतला, तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे असणाऱ्या खर्च कक्ष, माध्यम कक्ष व एक खिडकी कक्षाला काही मार्गदर्शक सूचना दिल्या. त्याच बरोबर त्यांनी विविध कक्षांच्या चालू असलेल्या व पूर्वनियोजित कार्यांबाबतीत संतोष व्यक्त केला.
या वेळी खडकवासल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे, सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. सुचेता साकोरे, निवडणूक खर्च कक्ष समन्वय अधिकारी सुजीत देवकर, माध्यम कक्ष समन्वयक विजयेंद्र गायकवाड, एक खिडकी कक्ष समन्वयक स्वाती नरुटे आदी उपस्थित होते.