पुणे : धुमसत्या पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागात 1970 च्या दशकापासून ‘शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजविण्यासाठी जीवन समर्पित करणारे ध्येयनिष्ठ, दूरदर्शी, कर्मयोगी शिक्षक स्व. भय्याजी काणे यांचा रौप्य महोत्सवी स्मृतीदिन पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे आणि माणिपूर येथे साजरा साजरा करण्यात आला. स्मृतीदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या इ-वार्ताच्या पहिल्या अंकाचे आणि www.psvp.in या नव संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते निष्णात विधीज्ञ श्री प्रशांतजी यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या कार्याला सक्षम करण्यासाठी लोकसहभागातून कार्य उभे करण्याचे आव्हान अतिशय मार्मिक शब्दात मांडून कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
भय्याजींच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमास सुरवात झाली. प्रतिकूल परिस्थितीत पूर्वोत्तर भारताच्या सीमाभागात वैश्विकतेचे भान असलेली आणि राष्ट्रीयत्वाचा विचार करणारी पिढी घडविण्याचे पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कार्याची माहिती डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. माणिपूरच्या सीमाभागातील संस्थेच्या शाळांमध्ये जाऊन अध्यापनाचे कार्य करणाऱ्या पुण्याच्या वीणाताईंनी त्यांचा अनुभव सांगून या कार्यात सहभागी होण्यासाठी सर्वांचा उत्साह वाढविला. इ-वार्ता आणि संकेतस्थळाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतले जाणारे मुल्याधिष्ठित शैक्षणिक उपक्रम, संस्थेचे भविष्यकालीन उद्दिष्ट, संस्थेच्या बळकटीकारणासाठी पुणे येथे सुरू असलेले रचनात्मक कार्याची मांडणी सौ. श्रुती प्रणव मेहता यांनी केली. आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुण्यातून निधी संकलन आणि स्वयंसेवकांची फळी निर्माण करण्याची निकड तसेच पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागातील विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावे म्हणून प्रतिष्ठान पालकत्व योजनेची सविस्तर माहिती प्रतिष्ठानचे जेष्ठ उत्साही कार्यकर्ते सुधीरजी पडळीकर यांनी दिली. यासाठी रु. 15000/- या प्रमाणे इच्छुक देणगीदारांनी पालकत्व स्वीकारवे असे आव्हान करण्यात आले आणि 2000 हून अधिक पालक याकामासाठी पुढे येतील असा विश्वासही व्यक्त केला. प्रमुख अथितींच्या प्रेरणादायी भाषणानंतर पासयदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी संस्थेचे सचिव, भय्याजींसोबत वयाच्या 12 व्या वर्षापासून राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यासाठी जीवन समर्पित करणारे भय्याजींचे शिष्य जयवंतजी कोंडविलकर, संस्थेचे समन्वयक श्रीपादजी दाबक हे आभासी पद्धतीने माणिपूर येथून कार्यक्रमात सहभागी झाले होते. संस्थेच्या मणिपूर येथील शाळांमध्ये फुटबॉल स्पर्धाआणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतनजी कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन चिन्मय देवगावकर यांनी केले. कार्यक्रम संयोजिका सौ. कल्याणी टोकेकर उपस्थितांचे आणि कार्यक्रमात योगदान दिलेल्या सर्वांचे यांनी आभार मानले.
फुटीरतावादाचे सावट असलेल्या पूर्वोत्तर भारताच्या सीमा भागात राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजवायचा असेल तर लोकसहभागातून प्रतिष्ठानला सक्षम करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले. देशनिर्मितीच्या कार्यात आपल्या परीने वाटा उचलू इच्छिणाऱ्या देणगीदारांसाठी www.psvp.in या संकेतस्थळावर थेट देगणी देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.