नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती विधानसभेचे अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत खासदार शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
शरद पवार यांचे भाषण
कालच विधानसभेचा फॉर्म भरला आणि आपली एक जुनी पद्धत आहे की, निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करायची असेल कन्हेरीला जाऊन मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपण आपल्या कामाची सुरुवात करतो. १९६७ साली माझ्या आयुष्यातला पहिला फॉर्म भरला त्याची सुरुवात इथून झाली. १९६७ पासून आजपर्यंत गेले ५५ वर्ष ज्या ज्या वेळेला निवडणुकीचा फॉर्म भरायची वेळ आली त्याची सुरुवात कन्हेरीतून केली. मारुतीरायाचा आशीर्वाद आहे, सर्वसामान्य जनतेच्या सदिच्छा आहेत. त्यामुळे सतत यश आले आहे.
आज नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून युगेंद्रची उमेदवारी आपण पुढे दिली. मला विश्वास आहे, मारुतीरायाचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांची साथ आजपर्यंत जसे यश मिळाले तसे यश याही वेळेला मिळेल. आज मला इथे येण्याच्यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांच्या प्रमुखांनी फोन केले आणि मला सांगितलं की ही जी तुमची सभा आहे, ही सबंध महाराष्ट्रात दाखवली जाणार आहे. म्हणून बारामतीच्या उमेदवाराबद्दल तुम्ही बोलाच. पण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा काही समजलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांना सुद्धा हात घाला. त्यामुळे निवडणुकीच्या बाहेर जाऊन सुद्धा थोडं बोलावं लागेल.
आधीच्या भाषणामध्ये युगेंद्रने सांगितलं बेकारीचा प्रश्न, कारखानदारीचा प्रश्न. महाराष्ट्र हे राज्य एक काळ असा होता की, उद्योगधंद्याच्या बाबतीत देशातला एक नंबरचा राज्य होता. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री ज्या वेळेला होते त्यावेळेला एमआयडीसीची कल्पना त्यांनी मांडली. पुण्याच्या आजूबाजूला जी गावं होती त्या गावांचा चेहरा बदलला. टाटा सारखी कंपनी आली, बजाज सारखी कंपनी आणली हजारो हातांना काम मिळालं. शेवटी हजारो हातांना काम द्यायचे असेल तर कारखानदारी वाढली पाहिजे. नवी पिढी शिकत आहे आणि काम नाही मिळालं तर निराशा येते. काही अर्धवट शिकतात त्यांनाही काहीतरी काम करण्याचा अधिकार द्यावा लागतो. ते कसे करता येईल? कारखानदारी काढायची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रामध्ये चित्र बदललंय. तुम्हा सर्वांना नाव माहित आहे. या देशातले सर्वात मोठे उद्योगपती ज्यांचं निधन झालं त्यांचं नाव रतन टाटा! त्यांनी या देशाची मोठी सेवा केली, हजारो कारखाने काढले. जवळपास ४० लाख मुलांना काम दिलं, अनेक संस्था उभ्या केल्या. टाटांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय विमान तयार करण्याचा कारखाना काढायचा एअरबस! या जगामध्ये या देशातून त्या देशात जायला मोठा विमान असतं त्याचं नाव एअरबस. ज्या विमानाची किंमत ६०० ते ६५० कोटींच्या वर असते पण अतिशय उत्तम विमान असतं. जगामध्ये ते जायला लागलं. पहिले आपण ते परदेशातून घेत होतो. टाटांनी ठरवलं की परदेशातील माल का घ्यायचा? एअरबस हा कारखाना आपण महाराष्ट्रात काढला, परदेशातून आणायचं बंद केलं. देशाचे चलन वाढतंय, हाताला काम मिळेल म्हणून त्यांना आम्ही सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की आम्हाला नागपूरला जमीन द्या. त्यासाठी नागपूरला ५०० एकर जमीन पाहिजे होती, तिथे एमआयडीसीमध्ये होती सरकारने त्यांच्यासाठी राखून ठेवली. मनमोहनसिंग मी स्वतः त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. आमचं सरकार बदललं मोदी साहेबांचं राज्य आलं. मोदी साहेबांनी काय केलं? सरकार बदललं टाटांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की कारखाना आम्ही सांगेल तिथेच करायचं. कुठे करायचं? म्हणे गुजरातला करायचं. ज्या कारखान्यामुळे महाराष्ट्राच्या काही हजार मुलांच्या हाताला काम मिळणार होतं, ज्या कारखान्याच्या साठी महाराष्ट्र सरकार जमीन द्यायला तयार होत होतं तो कारखाना आज गुजरातला गेला. आजचं वर्तमानपत्र बघितलं तर तुम्हाला कदाचित फोटो बघायला मिळेल तिथे कारखाना उभे करणारे लोक आणि मोदी साहेब बडोद्याला काही पाहणी करत आहेत. महाराष्ट्राचा हा कारखाना तिथे हलवला.
तुम्हाला संगणक माहित आहे का? कॉम्प्युटर! त्या संगणकाची एक चीप असते आणि त्या एवढ्या चिप मध्ये जगाची सर्व माहिती सुद्धा ठेवता येते. त्याचा कारखाना महाराष्ट्रात काढण्याचा निर्णय झाला. कंपनीचे नाव वेदांता फॉक्सकॉन! महाराष्ट्रात जमीन वगैरे सगळी द्यायची तयारी ठेवली. तो कारखाना या ठिकाणी आला तर काही हजार मुलांना काम मिळणार होता. मोदी साहेबांचं राज्य आलं, वेदांताच्या माणसांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की गुजरातला कारखाना काढा. प्रधानमंत्री हा देशाचा असतो, राज्याचा नाही त्यांनी देशाचा विचार करावा लागतो. पण त्यांनी देशाचा विचार केला नाही, त्यांनी एका राज्याचा फक्त विचार केला. त्याचा परिणाम देशातील एक नंबरच्या उद्योगधंद्याचे राज्य महाराष्ट्र होते त्या महाराष्ट्राचा नंबर आता एक वरून पाचव्यावर आला, आमचा नंबर घसरला. आता ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या तरुण मुलांना रोजगारी मिळणार होती ते घालवायचं पाप ज्यांनी केलं त्यांना आम्ही निवडणुकीत मत देणार नाही. त्यांच्या लोकांना आम्ही साथ देणार नाही. हा निकाल तुम्हाला आणि मला सर्वांना घ्यावा लागेल.
मगाशी बोलत असताना सांगितलं शेतीमालाच्या किंमती. खरं सांगायचं म्हणजे या विषयाची मला माहिती आहे. दहा वर्षे हिंदुस्तानचे शेती खाते माझ्याकडे होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना शेती खातं माझ्याकडे होतं. अनेक गोष्टी केल्या, अनेक निर्णय घेतले. आजचं जे सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचं विचार करत नाही. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत हे सरकारचं कर्तव्य आहे, आजचं सरकार त्या गोष्टीला विरोध करत आहे. त्याचा परिणाम आज शेतकरी उध्वस्त झालेला आहे. आज या देशामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांना एक पदवी मिळाली. इथे आत्ता भाषण केलं लक्ष्मण माने यांनी त्यांना केंद्र सरकारने साहित्यात त्यांनी केलेला काम याची नोंद घेतली त्यांना पद्मश्री पदवी दिली. केंद्र सरकारने मला पद्मविभूषण पदवी दिली. शेतकऱ्यांना एक पदवी मिळाली काय पदवी मिळाली? तुमच्यातील अनेक या पदवीचे मालक आहात. ती पदवी थकबाकीदार! थकबाकीदारांची संख्या वाढली, शेतीमालाची किंमत मिळाली नाही, खर्च वाढला, प्रपंचाचा खर्च वाढला, बँकेच्या किंवा सोसायटीचे पैसे देऊ शकले नाहीत आणि थकबाकी झाली. दोन वर्षांच्या नंतर थकबाकीदार होतो नवीन कर्ज मिळायचा रस्ता बंद होतो त्याची शेती उध्वस्त व्हायच्या रस्त्यावर येते. आज थकबाकीदारांची संख्या वाढत आहे. याचा अर्थ शेतकरी संकटामध्ये आहे. त्याचे महत्त्वाचे कारण आजचे राज्यकर्ते या शेतकऱ्यांबद्दल लक्ष देत नाही आणि त्यासाठी जो शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, भूमिपुत्रांच्या विरोधी आहे, काळ्या आईची सेवा करतात त्यांच्या विरोधी आहे त्यांना आम्ही दाराशी उभे करणार नाही. हा निकाल घ्यावा लागेल त्याशिवाय ही मंडळी सरळ होणार नाही.
अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे लोक सोयाबीन घ्यायला लागले. कारण सोयाबीन पूर्वीच्या काळात आता ज्वारी जवळपास कमी झाली आणि सोयाबीनचे पीक घ्यायला लागले. त्याची किंमत चांगली होती, का? परदेशामध्ये आपले सोयाबीन जात होते. आम्ही लोक सत्तेत होतो तेव्हा अनेक देशांशी वाटाघाटी केल्या आणि आमचे सोयाबीन घ्या म्हणून सांगितलं, शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले. आज मोदी साहेबांचे सरकार आले आणि परदेशात सोयाबीन पाठवायला बंदी केली. बंदी केली याचा अर्थ त्याच्यावर कर बसवला. त्यामुळे सोयाबीन बाहेर जायचं थांबलं. इथे लोकांनी पिकवलं, गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालं किमती खाली आल्या. उध्वस्त कोण झाला? शेतकरी आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी हे घडलं. उसाची किंमत थोडी बहुत वाढली पण साखर निर्यात जर केली तर ऊस उत्पादकांना अधिक पैसे देणे शक्य आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधने घातली आणि त्याचे परिणाम साखर बाहेर जायची कमी झाली. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना ऊसाची किंमत जादा द्यायची इच्छा होती त्याची आज पूर्तता करता येत नाही. त्यामुळे जो शेतकरी विरोधी आहे, त्याच्या संसाराला खिळ घालतो त्यांचं आमचं जमणार नाही ही आमची भूमिका आहे. मोदी साहेबांचं आणि माझं काही भांडण नाही, चांगले संबंध आहेत. बारामतीला आले होते चांगलं भाषण केलं. बारामतीत त्यांनी सांगितलं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम प्रशासन करणारे कोण असेल तर त्यांनी नाव घेतलं माझं. पण भले माझे नाव त्यांनी घेतलं असेल, कौतुक केलं असेल. पण उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर तो आमचा जोडीदार होऊ शकत नाही. त्यांनी माझा काही वान चोरला नाही, काही माझं त्यांचं भांडण नाही. पण जोपर्यंत या प्रश्नांची सुटका नाही तोपर्यंत आम्ही त्यांना त्यांच्यावर टीका करणार, पार्लमेंट मध्ये बोलणार, जिथे संधी मिळेल तिथे बोलणार आणि त्यांना योग्य रस्त्यावर आणण्याची संबंधीची भूमिका घेणार.
अलीकडच्या काळामध्ये काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. तुम्ही निवडणुका अनेक वेळेला बारामतीच्या बघितल्या आहेत. माझ्या बघितल्यात, सुप्रियाच्या बघितल्यात, अजितदादांच्या बघितल्यात आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हा सर्वांची साथ होती. या निवडणुका आम्ही आत्तापर्यंत केल्या त्या काही विचारातून केल्या, पक्षातून केल्या. तुम्ही लोकांनी साथ दिली, महाराष्ट्राने साथ दिली. निवडणुका घ्यायला एकट्याची असेल तर अपक्ष आणि राज्याचे काही कारभार करायचे असेल तर पक्ष याची खूण असते. आता जशी युगेंद्रची खूण आहे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ तशा खुणा असतात. महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षे आम्ही लोकांनी पक्ष काढला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ तुम्ही लोकांनी साथ दिली. अनेक वर्षे लोक निवडून गेले, महाराष्ट्राचं राज्य सुधारलं. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि या पक्षाला मदत झाल्याने चित्र बदललं. पक्ष स्थापन कोणी केला? हा जो पक्ष आहे तो कोणी काढला? पक्ष काढला मी, खूण कोणाची होती? एक दिवशी काही लोकांनी आमच्यावर खटला केला. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला की पक्षाचे मालक हे नाहीत, आम्हीच आहोत. ही खुण त्यांची नाही ती आमचीच आहे. केस झाली दिल्लीला तिथे दिल्लीच्या कोर्टात त्याची सुनावणी झाली. ज्यांनी केस केली त्यांनी एक नंबर त्यांच्यावर कोण मुख्य माणूस ज्याच्यावर आमची केस आहे म्हणून त्याला समन्स काढलं. एक नंबरचं समन्स त्या समन्सचे नाव शरद गोविंदराव पवार! हे समन्स माझ्यावर काढलं की कोर्टात तुम्ही हजर रहा. कोर्टाचे समन्स, इलेक्शन कमिशनचे समन्स. इलेक्शन कमिशन ही कोर्टाची यंत्रणा आहे. समन्स ला हजर राहावं लागतं. समज कधी पाहिलं नव्हतं पण गेलो कोर्टात, राहिलो उभा तिथे. दिवस दिवसभर खटला चालू दिवस दिवसभर त्या ठिकाणी उभा करण्याच्या संबंधीचे काम केलं. तक्रार माझ्या विरोधात, तक्रार कोणाची? चिरंजीवांची. दोन नावं दोन्ही पवार माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं पण ती केस करून मला त्या ठिकाणी खेचलं गेलं. केंद्र सरकार त्यांच्या हातात त्या सरकारमध्ये काय चक्र फिरवली माहीत नाही. कोर्टाने निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याचे आहे शरद पवारांचे काही संबंध नाही. मोठ्या गमतीची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला नवीन चिन्ह घ्यावं लागलं. पक्षच पळवला, खूण पळवली. एवढेच करून थांबले नाहीत आणि तुम्हा लोकांना विनंती केली महाराष्ट्राला विनंती केली की आमचे आमदार निवडून द्या. महाराष्ट्राने अनेकदा माझा शब्द मान्य केला आणि महाराष्ट्राचे राज्य आम्हा लोकांच्या विचारांच्या लोकांच्या हातात दिलं. मी त्या राज्यात कधी नव्हतो. खूपदा मंत्री तुम्ही मला केलं, चारदा मुख्यमंत्री काय साधी गोष्ट आहे? देशाचा संरक्षण मंत्री, दहा वर्ष शेती मंत्री आणखी काय द्यायचं लोकांनी? म्हणून निकाल घेतला लोकांच्यात राहायचं पण मंत्री पदाची अपेक्षा करायची नाही. मग सरकार विरोधात आणि जवळपास तीन वेळेला सबंध सरकार आम्हा लोकांच्या विचारांचं होतं. उपमुख्यमंत्री कोणाला करायचं? प्रश्न माझ्यापुढे होता आम्ही चर्चा करायचो. चार वेळेला उपमुख्यमंत्री बारामतीचा! एकदा नाही चारदा. आपल्या पक्षाचं पाचव्यांदा पहिल्यांदा भाजपवाल्यांची मदत घेतली. काय कारण होतं? भाजपवाल्यांनी मतं दिली? कालची लोकसभेची विधानसभेची निवडणूक झाली पाच वर्षांपूर्वीची त्यावेळेला भाजपवाल्यांनी मतं दिली नव्हती. मत तुम्ही दिली होती, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दिली होती. मग असे असताना त्यांच्या मदतीने कशासाठी पद घेतलं? लोकशाहीमध्ये पद लागतं लोकांची सेवा करायला. पण लोकांची साथ त्याच्यामध्ये कमी असली तर आपली चूक काय झाली याचा विचार करून सुधारणा करून लोकांचा विश्वास संपादित करायचा असतो. मी अनेक वेळेला विरोधी पक्षाचा नेता होतो. अनेकदा सत्ता माझ्या हातात नव्हती. त्यामुळे लोकांची साथ कधी सोडली नाही त्यामुळे लोकांनी पुन्हा संधी मिळेल त्या वेळेला मदत करण्याची भूमिका घेतली.
आज सांगितलं जातं बारामतीचा विकास! विकास हा सगळ्यांच्या मदतीने होतो. माझा हातभार असेल, अजितदादांचा हातभार असेल आणखी कोणा कोणाचा असेल सगळ्यांच्या प्रयत्नांनी विकास होत असतो. त्याचा आनंद आहे. विरोधकांनी विकास केला तर त्याला चांगलं म्हणायचं हा माझा स्वभाव आहे. अनेक संस्था आपण सुरू केल्या देश पातळीवर त्याचे नाव लौकिक आहे. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांनी देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये तुम्हाला राज्यात प्रगती करायची असेल तर त्यांनी शब्द वापरला बारामती पॅटर्न! बारामती पद्धत ही स्वीकारा त्यामुळे तुमचे राज्य प्रगतीच्या पथावर जाईल या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली. मी राज्य चालवायची जबाबदारी सोडली, मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली. सगळा कारभार नव्या पिढीच्या हातामध्ये दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा अध्यक्ष मी होतो मान्य आहे पण त्याच्यातून उभी झालेली कारखानदारी, अधिकार हा नव्या पिढीला दिला. नव्या पिढीला दिल्यानंतर राजकारणात कधी यश येतं कधी अपयश येतं कधी सत्ता असते कधी नसते. सत्ता नाही म्हणून आपले सहकारी आहेत त्यांची साथ सोडायची नसते. दुर्दैवाने सत्ता नसताना आमच्या काही सहकाऱ्यांनी उद्योग केला. पहाटेच उठले आणि पहाटे उठून शपथ घेतली मोठ्या गमतीची गोष्ट आहे. साडेपाच वाजता सहा वाजता शपथ? त्या गव्हर्नरला झोपेतून उठवलं आणि सहा वाजता शपथ त्या ठिकाणी घेतली. कशासाठी? आपला विचार सोडला आणि शपथ घेतली. परिणाम काय झाला? चार दिवस टिकलं राज्य, चार दिवसांपेक्षा जास्त नाही. पण ही गोष्ट करणे योग्य नाही ही भावना जनतेच्या मनात झाली आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही दिलेल्या कामांमध्ये वेगवेगळ्या आणि इथे ज्यांच्या हातात सगळं काम दिलं त्यांनी एक दिवशी पक्षच घेतला आणि दुसरीकडे जाऊन बसले. पद मिळवलं झालं पद मिळालं नाही असं नाही. पण त्याच्या आधी चार वेळेला ते पद मिळालं होतं ना? चार वेळेला तुम्हाला पद मिळालं एखाद्याला नाही मिळाला तर घर फोडायचं असतं? असं सांगण्यात आलं की घर मी फोडलं. मोठी गमतीची गोष्ट आहे घर फोडायचं काही कारण नाही मी घरातला पवार कुटुंबातला वडीलधारा मी आहे आणि आज पर्यंत सगळे माझे ऐकतही होते मी काही त्यांच्या मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी करत नव्हतो आणि करणारही नाही इथून पुढे कोणी कशीही भूमिका घेतली तर मी कधी चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही. कुटुंब एक कसे राहील? याची मी काळजी घेईन. हा माझा स्वभाव आहे मला काही दुसरं करायचं नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती, मर्यादा होती अनेक पद द्यायचा मला अधिकार आहे, होता. कोणाला मंत्री केलं, अनेकांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, अनेक पद दिली एक पद सुप्रियाला दिलं का? कधी एक पद सुप्रियाला दिलं नाही. बाकीच्यांना पद दिली स्वतःच्या मुलीला कधी पद दिलं नाही आणि तिनेही कधी मागितलं नाही. ठीक आहे बाकीच्यांना द्या आणि ह्याच पद्धतीने केलं. आज त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि हे करत असताना घर एकत्र ठेवलं पाहिजे याच्याबद्दल कधी दुसरा विचार मनात आलेला नाही. अधिकार दिले सगळे तुम्ही सांगा इथले काही पदाधिकारी जुने गेल्या वीस वर्षांत छत्रपती साखर कारखाना, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, दूध संघ, खरेदी विक्री संघ कुठे मी कधी एक माणूस निवडला? सगळे अधिकार मी कुणाला कुठे नेमणार याची चर्चा सुद्धा केली नाही. सगळ्या संस्थांचे अधिकार हे त्यांना दिले माझे फक्त लक्ष शिक्षणावर होते आणि शेतीकडे बाकी कुठेही लक्ष दिले नाही. सगळ्या संस्था या हातामध्ये दिल्या. आज इतक्या वर्षांच्या एवढ्या सगळ्या गोष्टी असताना ही स्थिती का व्हावी? म्हणून मला काल भाषणात जे सांगण्यात आलं की घर फोडलं घर फोडण्याचा पाप माझ्या आई-वडिलांनी माझ्या भावांनी मला कधीही शिकवलं नाही. माझे भाऊ सगळे अनंतरावांच्या सह माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे होते. मी कधी घराचा संसार बघितला नाही शेती बघितली नाही सगळी यांनी बघितली आणि मी गावभर हिंडत बसलो. राजकारण करत बसलो देशाच्या पातळीवर करत बसलो का? या सगळ्या भावांचा आशीर्वाद माझ्या मागे होता त्यामुळे मी हे सगळं करू शकलो. त्यामुळे ते भाऊ किंवा त्यांची मुलं बाळ यांच्यात माझ्यापासून कधी अंतर येणार नाही ही माझी भूमिका राहील. कुणी कशी मतं घेतली कशी भूमिका घेतली त्याच्यामध्ये माझ्याकडून कुठल्याही प्रकारची भूमिका होणार नाही.
सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. त्यावेळेला सुनेत्रा उभ्या होत्या. भाषण काय होती नेत्यांची? भाषणं होती की साहेब येतील भावनाप्रधान बोलतील, भावनेला हात घालतील तर भावनाप्रधान तुम्ही होऊ नका. साहेब येतील डोळ्यात पाणी आणतील आणि मत द्या म्हणून सांगतील त्याला कधी तुम्ही हे करू नका, भावनाप्रधान होऊ नका. चांगलं आहे माझ्यासाठी सल्ला दिला. कालच्या सभेमध्ये हा प्रश्न भावनेचा नाही आहे, हा तत्वाचा आहे विचारांचा आहे. गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांचे विचार आम्ही घेतलेले आहेत आणि त्या विचारांनीच काम करतो व करणार. विचारधारा गांधी-नेहरू, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू राजे या सगळ्यांची विचारधारा ही माझी विचारधारा आणि त्या विचारधारेच्या रस्त्याने काम करणं ही माझी पद्धत आहे त्याच्यामध्ये तडजोड नाही. म्हणून इथून पुढे जात असताना महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष घालीन. उद्या महाराष्ट्राची सत्ता बदलण्याची इच्छा आहे मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोय गेली जवळपास चार महिने महाराष्ट्रातले अनेक तालुके मी उलटे पालथे केले आहे आणि त्याचे कारण महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची आहे. महाराष्ट्राची सत्ता ही सामान्य लोकांच्या हातात द्यायची आहे. महाराष्ट्राची सत्ता शेतकऱ्यांच्या विरोधात जे काम करतात त्यांच्या हातातून घ्यायची आहे आणि सामान्य माणसाची राजकारण करण्याच्या साठी सत्ता घ्यायची आहे. त्यासाठी ही सत्ता त्या ठिकाणी हवी आहे. ते करायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एकजुटीने आपली शक्ती उभी केली पाहिजे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष पाटबंधारे खात्याचे काम कोणाकडे आहे? आता त्यांच्याकडे काम आहे त्यांच्याकडून वीस वर्षात जनाई-शिरसाई सारखी कामे होत नसतील तर मला लक्ष घालावे लागेल. ही निवडणूक संपल्यानंतर त्याच्यामध्ये जे सहकार्य देतील, सरकार मधले मंत्री त्याचे कारण त्या जिरायत भागातल्या लोकांना काही ना काहीतरी पाणी द्यायचं ही अपेक्षा आहे. ते करण्यासंबंधीचा आग्रह धरण त्याच्यावर माझे अधिक लक्ष राहील एवढाच विश्वास आज यानिमित्ताने देतो. निवडणुकीला नव्या पिढीचा प्रतिनिधी दिला आहे. तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं २६-२७ व्या वर्षी ३० वर्ष मी काम केलं महाराष्ट्रात २५-३० वर्ष दिल्लीमध्ये केलं. नंतरच्या काळामध्ये अजितदादांच्या कडे २५-३० वर्ष आपण संधी दिली. नेहमी नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी उद्याचे विचार करतो. त्या हेतूने आम्ही युगेंद्रचा निर्णय घेतलेला आहे. उत्तम शिक्षण आहे परदेशातलं अमेरिकेसारख्या देशातून शिकून आलेला आहे. आल्यानंतर शेती कारखानदारी याच्यावर किती लक्ष देतील माहित नव्हतं पण त्यांच्याजवळ साखर कारखाना उभा केला अतिशय चांगला कारखाना म्हणून त्या कारखान्याचा लौकिक आहे. ती सगळी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि यशस्वी करून दाखवली. काम सांगितल्यानंतर उत्तम करायचा हा त्यांचा स्वभाव दिसला. विद्या प्रतिष्ठान संस्थेवर त्यांना घेतलं तिथेही चांगल्या पद्धतीने काम होत आहे. चांगल्या पद्धतीने काम करणारी नवी पिढी तिला अधिक संधी देऊन मोठं करणं आणि उद्याच्याला तुम्हा लोकांच्या प्रश्नांना हातभार लावणारे एक नेतृत्व तयार करणे याची गरज आहे त्या गरजेपोटी ही उमेदवारी या ठिकाणी आहे. त्यांची खून तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यांची खून तुम्ही लक्षामध्ये घ्या. तुतारी वाजवणारा माणूस! नुसती तुतारी म्हणू नका त्यामुळे घोटाळा होतो. निवडणुकीमध्ये कोणी काहीही बोललं तरी शांत डोकं ठेवायचं, नम्रता कायम ठेवायची. कोणी काहीही केलं कोणी आरे म्हटलं त्याला कारे म्हणायचं नाही खाली मान करून राहायचं. आपल्याला कितीही काही कोणी घोषणा दिल्या तरी राम कृष्ण हरी!