पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या बंडखोर नाना काटे हे माघार घेतली. नाना काटेंचं हे बंड शमवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच भेट घेतली होती. तसेच, शरद पवारांनी सुध्दा काटे यांच्यासोबत संवाद साधल्याची माहिती मिळत आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी देखील नाना काटे यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
नाना काटे हे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून इच्छुक होते. त्यामुळे दोन्ही कडील नेत्यांनी त्यांची समजूत काढली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आता महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी थेट लढत होणार आहे. राहुल कलाटे यांची चिंचवड विधानसभेची चौथी निवडणूक आहे, तर शंकर जगताप हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. नाना काटे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने चिंचवडच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीमध्ये रंगत वाढली आहे.