कोथरूड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार किशोर शिंदे यांची नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये शास्त्रीनगर परिसरात निवडणुकीच्या प्रचारार्थ पदयात्रा सुरू होती. ही पदयात्रा सुरू असताना अचानक पणे कुणाचा तरी फोन आला आणि किशोर शिंदे यांनी पदयात्रा आटोपती घेऊन क्षणाचाही विलंब न लावता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये धाव घेतली. कारण आपल्या जवळचा सहकारी आणि स्वतः किशोर शिंदे अध्यक्ष असलेल्या कोथरूड मधील संगम तरुण मंडळाचा उपाध्यक्ष नितीन सुभाष कुंबरे याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ॲडमिट केले असून त्यांच्या नातेवाईकांचा त्यांना मदतीसाठी फोन आला होता.
किशोर शिंदे त्यांचे सहकारी संजय काळे ,अमोल खराडे आणि सचिन ननावरे यांच्या समवेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि त्यांनी नितीन कुंबरे यांच्या भावाची भेट घेतली आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला माझ्या सहकाऱ्यावर तज्ञ डॉक्टरांकडून योग्य ते उपचार करा,उपचारांमध्ये काही कमी पडून देऊ नका आणि काही आवश्यकता भासल्यास मला संपर्क साधा अशा सूचना देखील केल्या. हे सर्व करीत असताना अचानक तिथे एका आजोबा त्यांच्या कुटुंबीयांसमवेत रुग्णालयामध्ये ॲडमिट होण्यासाठी आले होते. पायाला दुखापत झाली असल्यामुळे त्यांना त्यांच्या गाडीतून उतरवून व्हीलचेअर वर बसवण्यासाठी किशोर शिंदे यांनी स्वतः त्यांचे सहकारी संजय काळे यांच्या समवेत मदत केली. त्या कुटुंबाने किशोर शिंदे यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. आम्ही तुम्हाला ओळखतो प्रचाराच्या एवढ्या व्यस्त दिनचर्येमध्ये आपण रुग्णालयात आलात कळत नकळत आपल्या हातून माझ्या वडिलांची सेवा झाली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते आणि आपल्याला विजयी होण्यासाठी शुभेच्छा देते अशा प्रतिक्रिया त्यावेळी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.
प्रचाराच्या एवढ्या धामधुमीतूनही वेळ काढून आपल्या सहकाऱ्याला भेटायला येऊन तेथील अन्य रुग्णाच्या मदतीला धावून आलेले किशोर शिंदे यांना पाहून तेथे असलेल्या सर्व उपस्थितांची त्यांनी मन जिंकली. किशोर शिंदे यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.