बाणेर मध्ये १९९७ साली पहिल्या भाजपाच्या शाखेचे उद्घाटन ते मतदार संघात लाखोंचे लीड घेणारी भाजपा

बाणेर : बाणेर येथे 14 जून 1997 साली तत्कालीन खासदार अण्णा जोशी यांच्या शुभहस्ते बाणेर मध्ये पहिल्या भाजपाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. बाणेर गावातील विशाल गांधीले, सुधाकर धनकुडे आदी युवकांनी पुढाकार घेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपा पक्षाची सुरुवात करत पहिल्यांदा भाजपाची विचारसरणी या गावांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता.

या पहिल्या उद्घाटनाच्या वेळी अण्णा जोशी, दिवाकर पारखी, विशाल गांधिले, सुधाकर धनकुडे, शिवाजी मांडेकर, सुनिल कडुसकर, संतोष चिंचवडे, संदिप गांधिले, संदिप मोरे, विजय धनकुडे, संजीव जाधव, निवृत्ती राऊत, संतोष कळमकर, सुनिल धनकुडे, राजेश क्षिरसागर, बजरंग भाडाळे, प्रसाद धनकुडे आदी उपस्थित होते.

बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी परिसरामध्ये भाजपाने 30 हजाराहून अधिक मताधिक्य घेत आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना विजयाचा मार्ग सुखकर करून दिला. कोथरूड मतदार संघ सध्या भाजपाचा बालेकिल्ला समजला जात आहे. परंतु एकेकाळी बाणेर बालेवाडी सारख्या छोट्या गावांमध्ये भाजपा पक्षाचे काम करायला देखील कार्यकर्ते मिळणे दुर्मिळ असणाऱ्या या गावांमध्ये सध्या भाजपाने जोरदार मुसंडी घेतली आहे.

बाणेर बालेवाडी पुणे शहरातील भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण असलेले उपनगर ठरले आहे. पूर्वी या परिसरामध्ये एक हाती काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. या सत्ते विरोधात भाजपाने जोरदार संघर्ष करत भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सोबत आपली बांधणी केली. यानंतर 2014 साली भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी व  2019 ला आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.  तर 2017 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जोरदार मुसंडी मारत पालिकेत देखील तीन नगरसेवक पाठवत आपला वरचष्मा निर्माण केला. यानंतर भाजपामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच अन्य पक्षांचे अनेक पदाधिकारी भाजपा मध्ये समाविष्ट झाले. तर लोकसभेला खासदार मुरलीधर मोहोळ यांना वीस हजाराहून अधिक मताधिक्य देत भाजपाने आपली ताकद दाखवून दिली होती.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये उत्तर विभागाच्या भाजपा कार्यकर्त्यांनी केलेले सामूहिक प्रयत्न यामुळे आमदार चंद्रकांत दादा पाटील एक लाखाहून अधिक मताधिक्य घेत विजयी झाले आहेत. अवघ्या काही कार्यकर्त्यांच्या जोरावर बाणेर मध्ये स्थापन झालेली भाजपाची शाखा ते मतदारसंघांमध्ये हजारोंच्या घरात लीड देत आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा देखील महत्त्वपूर्ण वाटा मानला जात आहे. बाणेरच्या भूमीमध्ये संघर्षातून कमळ फुलले असल्याची भावना यावेळी जुन्या जाणत्या भाजपा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांकडून भाजपाचा अनोख्या पद्धतीने विरोध