खडकवासला निवडणूक कार्यालयाचा निरोप साभारंभ उत्साहात पार पडला

पुणे: खडकवासला विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनानंतर, कार्यालयाने अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी निरोप साभारंभाचे आयोजन केले. या साभारंभात निवडणूक प्रक्रियेतील उत्कृष्ट व्यवस्थापन, अचूकता, आणि पारदर्शकतेचा उल्लेख करत योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समर्पणाची प्रशंसा केली. “खडकवासला कार्यालयाने पारदर्शक व अचूक निवडणूक प्रक्रियेसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे,” असे त्यांनी नमूद केले. डॉ. माने यांनी पुढे सांगितले की, खडकवासला विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यात कर्मचार्‍यांनी अत्यंत मेहनत घेतली, त्याचबरोबर त्यांच्या कार्यशक्तीच्या आणि कुशलतेच्या जोरावर प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे यांनी मतमोजणी प्रक्रिया, ईव्हीएम व्यवस्थापन, आणि मतदान केंद्र नियोजनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमात प्रशिक्षक प्रा. तुषार राणे आणि प्रा. माधुरी माने यांनी मतमोजणी प्रक्रियेतील तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बाजूंवर मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.


साभारंभात नायब तहसीलदार सचिन आखाडे (इव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी), नारायण पवार (इव्हीएम कक्षाचे सहाय्यक), अंकुश गुरव (कार्यक्रम समन्वयक), मनीष झंसारी, दिपगौरी जोशी (पोस्टल बॅलेट कक्ष अधिकारी), प्रमोद भांड (सहा. महसूल अधिकारी), धम्मदीप सातकर, साहिद सय्यद, भूमेश मसराम (मनुष्यबळ कक्ष अधिकारी) यांच्या निवडणूक प्रक्रियेत अचूकता आणि दक्षता राखण्याच्या कार्याची प्रशंसा केली.मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्षाचे नोडल अधिकारी प्रा. मनिष खोडस्कर यांच्या कामगिरीचेही विशेष कौतुक करण्यात आले. मीडिया कक्ष प्रमुख योगेश हांडगे यांनी जागरूकता निर्मितीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. माने यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व कर्मचार्‍यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि निवडणूक प्रक्रियेतील एकात्मता व कार्यसंघाचा आदर्श निर्माण करण्यात सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले.
या निरोप साभारंभाने खडकवासला विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या यशस्वी कार्यकाळाचा समारोप केला.

See also  खडकीमध्ये १कोटी६०लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन