बाणेर : बाणेर येथील सर्वे नंबर 242 मधील तेजस्विनी सोसायटी मधील हाय टेन्शन लाईन खालील बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या नोटिसा पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहेत. यावर कारवाई कधी होणार याबाबत मात्र तर अद्याप गुलदस्त्यात असून एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासनाने पाहू नये अशी मागणी केली जात आहे.
बाणेर येथील सर्वे नंबर 242 तेजस्विनी सोसायटी मधून 132 केवी एच हाय टेन्शन लाईन जात आहे. या हायव्होल्टेज हायटेन्शन विद्युत वाहिनीच्या खाली अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच सुरक्षित अंतर सोडण्यात आले नसल्याने जीवित हानी होण्याची शक्यता देखील पालिकेच्या नोटीशीमध्ये वर्तवण्यात आली आहे. तसेच सोसायटीतील अंतर्गत रस्ते वीस फूट असताना फक्त पंधरा फूट ठेवण्यात आले असल्याने या रस्त्यांमधील देखील अतिक्रमण दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाणेर औंध हद्दीवरील विधाते वस्ती परिसरातील सोसायट्यांमध्ये अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज लाईन खाली अनाधिकृत बांधकामे असल्याने या परिसरात अपघात होण्याची शक्यता पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम व महापारेषण कंपनीने वर्तवली आहे. पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करून अपघाताची वाट न बघता अतिक्रमणे हटवली पाहिजेत अशी मागणी प्रवीण नवले यांनी केली आहे.
हाय व्होल्टेज लाईन खालील अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग व महापारेषण विद्युत कंपनीच्या वतीने तेजस्विनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे.