जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना १९५१ च्या कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

पुणे, दि. १३ : जिल्ह्यात पौड, लोणावळा व हवेली पोलीस ठाणे हद्दीत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची  मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी तसेच १ जानेवारी २०२५ रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा येथे मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून बहुसंख्य अनुयायी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देखमुख यांनी २५ डिसेंबर रोजी ००.१० वाजेपासून ते ७ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराअंतर्गत सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत.

रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी. कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होवू देणे यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

याशिवाय सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी  योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिपेक्षकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देण्याबाबतचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.

सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकारदेखील प्रदान करण्यात आले आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

See also  लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी