“RMC प्लांट्स बंद करा” – बावधनमध्ये नागरिकांचे जनआंदोलन; नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांची प्रशासनाला चेतावणी

पुणे : बावधन बुद्रुक परिसरातील रहिवासी भागात सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट्समुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात आज स्थानिक नागरिकांनी मोठे जनआंदोलन केले. “बंद करा… बंद करा… RMC प्लांट्स बंद करा” अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
गेल्या काही वर्षांपासून बावधन बुद्रुक परिसरात अनेक RMC प्लांट्स कार्यरत आहेत. या प्लांट्समुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. विशेषतः मोठ्या प्रमाणावर ये-जा करणाऱ्या जड वाहनांमुळे परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. शाळा, महाविद्यालये, सोसायट्या आणि रहिवासी भागाजवळून ही जड वाहने धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच या प्लांट्समधून होणारे धूळ प्रदूषण, आवाज आणि हवेत पसरलेले सिमेंटचे कण यामुळे परिसरातील वातावरण दूषित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः त्रास सहन करावा लागत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर रहिवासी भागामध्ये सुरू असलेले RMC प्लांट्स तात्काळ बंद करावेत, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्यात आले.

यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. रहिवासी भागातील RMC प्लांट्सवर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका रुपाली पवार, दीपक दगडे पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते, पोलीस निरीक्षक भास्कर कदम तसेच बावधन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिसरातील नागरिकांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रहिवासी भागातील RMC प्लांट्स तात्काळ बंद करण्याची मागणी जोरदारपणे मांडली. प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

See also  खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मतमोजणी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न