बाणेर : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यांचल हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला आहे. दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी शाळेत झालेल्या “छत्रपती शिवाजी महाराज – एक युगपुरुष” या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाची “भारताच्या जागतिक विक्रम पुस्तकात”नोंद झालेली आहे.
वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया तर्फे श्री संजय नार्वेकर व चीफ एडिटर सौ सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री अशोक मुरकुटे यांना पदक व मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शाळेचे विश्वस्त श्री भालचंद्र मुरकुटे, सौ श्वेता मुरकुटे,सौ योगिता बहिरट, इतिहास संशोधक व लेखिका सौ सायली गोडबोले जोशी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी हे उपस्थित होते.
सुमारे ८५० विद्यार्थी , शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी हा पुरस्कारप्राप्त कार्यक्रम सादर केला. शिशुवर्गापासून इयत्ता दहावी, असे ३ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी व काही शिक्षक यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या शिवरायांच्या जन्मापासून ते किल्ले रायगडावरील राज्याभिषेकापर्यंतचे जीवनप्रसंग व महाराजांनी रुजवलेली जीवनमूल्ये यावेळी रंगमंचावर चित्रित करण्यात आली.
सुमारे २००० हून अधिक पालक प्रेक्षक व निमंत्रितांनी याकार्याक्रमाला भरभरून प्रतीसाद दिला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज मा. श्री मारुती गोळे, सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज मा. श्री.करणसिंह मोहिते, मा. स्वप्ना गुप्ते व योगीराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष, माजी नगरसेवक श्री ज्ञानेश्वर तापकीर हे उपस्थित होते.शाळेच्या भव्य पटांगणावर हर हर महादेव व शिवाजी महाराज की जय च्या जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला .