मुळा नदी पात्रातील पर्यावरणाची हानी करणारी चुकीची कामे थांबवावीत – खासदार मेधा कुलकर्णी; खासदार कुलकर्णी यांची मनपा आयुक्तांसह मुळा नदीपात्राचे पाहणी

पुणे : मुळा व राम नदी संगमावर नदी सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामातील मोठ्या प्रमाणावर राहिलेल्या त्रुटींची पाहणी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले व खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संपर्क करून नदीपात्रातील काम त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी केली.

नदी सुधार योजनेसाठी केंद्र शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परंतु या माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या कामातील त्रुटींबाबत व पर्यावरणावर कायमस्वरूपी दुष्परिणाम होईल अशा कृतींबाबत विविध पर्यावरण प्रेमी संस्थांच्या वतीने व नागरिकांच्या वतीने दोन्ही महानगरपालिकांकडे सातत्याने तक्रारी करण्यात आले आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीमध्ये नदी पात्रातील कामांची व पर्यावरणाची माहिती घेतली यावेळी पर्यावरण प्रेमी संस्थांनी नदीपात्रात सुरू असलेल्या चुकीच्या कामांची माहिती आयुक्तांना दिली.

मुळा नदीचे पात्र या योजनेमुळे अरुंद होणार असून या परिसरातील हजारो  शेकडो वर्ष जुनी असलेली झाडे तोडली जाणार आहेत यामुळे या परिसरातील जैवविविधतेवर देखील परिणाम होणार आहे ही बाब पर्यावरण प्रेमी संस्थांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटीलयांना निवेदन दिले आहे. मागील पावसाळ्याचे अनुभव पाहता या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होते. नदीपात्रातील अनेक दुर्मिळ झाडे तोडली जात आहेत. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. हे चुकीचे काम थांबवणे आवश्यक आहे.

मनपा आयुक्त राजेंद्र भोसले म्हणाले, पूरस्थिती पुन्हा एकदा तज्ञांचे मत विचारात घ्यावे लागेल, याबाबत उपाययोजना कराव्या लागतील. बंडगार्डन येथे जे झाले ते पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आले आहेत. सगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात व उपायोजना करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे.

यावेळी बाणेर बालेवाडी पाषाण औंध परिसरातील विविध पर्यावरण प्रेमी संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक उपस्थित होते.

See also  कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना