पुणे : पुणे पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३२ गावांच्या विकासासाठी एक हजार कोटीं रुपयांचा निधी द्यावा. त्यासाठी पालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय हवेली तालुका
नागरी कृती समितीने केली आहे.
पुढील आठवड्यात पालिका आयुक्त डॉ . राजेंद्र भोसले अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर हवेली तालुका नागरि कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज धायरी येथे कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोपटराव खेडेकर, अमर चिंधे, संदीप चव्हाण, मिलिंद पोकळे, बंडूशेठ खांदवे, संदीप तुपे, दिनेश कोंढरे, संतोष ताठे , विलास मते, आदी सभासद उपस्थित होते.
कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले,
२०१७ व २०२० अशा दोन टप्प्यात पालिकेत ३४ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यातील दोन गावांची नंतर स्वतंत्र नगरपालिका केली आहे. ग्रामपंचायतीकडून नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने या गावांत विकासा अभावी बकालपणा वाढला होता त्यामुळे न्यायालयीन लढा देऊन या गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला मात्र अद्यापही या गावांत पायाभूत सुविधांचा अभाव आहे त्यामुळे पाणी, रस्ते, कचरा आदी समस्या गंभीर बनल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या गावांच्या विकासासाठी एक हजार कोटीं रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करावी.