कायदेशीर प्रक्रिया पार पडल्याशिवाय पालिकेला खाजगी जागेत डांबर टाकून देऊ नका, नाहीतर तुम्ही अडचणीत याल

बाणेर : बाणेर औंध हद्दीवरील सर्वे नंबर 242 मधील खासगी जागेमध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने बळजबरीने केलेल्या डांबरी रस्त्यामुळे खाजगी जागा पुणे महानगरपालिकेचा कर लावून देण्यास विलंब केला जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

बाणेर सर्वे नंबर 242 मध्ये बाणेर औंध हद्दीवरील रस्ता आहे. हा रस्ता 60 फूट डीपी प्रमाणे औंध हद्दीमध्ये आहे. परंतु पुणे महानगरपालिकेने सोईसाठी बाणेर हद्दीत काही फूट जागेमध्ये वाहतूक सुरळीत होण्यासाठी रात्रीत डांबरीकरण करत खाजगी जागेमध्ये डांबर टाकून रस्ता केला होता.

परंतु जागा मालकाने मोकळ्या जागेला कर लावून देण्यासाठी अर्ज केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने सदर जागेत डांबरी रस्ता दिसत असल्याचे कारण देत कर लावून देण्यास नकार दिला. पुणे महानगरपालिकेच्या अजब कारभारामुळे संबंधित जागा मालकाला पुणे महानगरपालिकेत जागेला कर लावून घेण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

खाजगी जागेमध्ये पुणे महानगरपालिकेला काम करण्याचा अधिकार नसताना देखील रस्ता कसा करण्यात आला व रस्त्याचे कारण दाखवून कर लावण्यासाठी केली जात असलेली दिरंगाई याबाबत काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जागा मालक प्रवीण नवले म्हणाले, बाणेर औंध हद्दीवरील माझ्या जागेसंदर्भात मला मोकळ्या झालेला कर लावून मिळावा यासाठी मी ऑगस्ट 2024 मध्ये अर्ज केला आहे. परंतु पुणे महानगरपालिकेच्या कर विभागाकडून कागदी घोडे नाचवण्याचे काम होत आहे. सध्या माझा अर्ज हा विधी विभागाकडे पाठवण्यात आला आहे. माझ्या जागेमध्ये रस्त्याचे डांबर दिसत असल्याचे कारण यासाठी देण्यात आले असून पुणे महानगरपालिकेने केलेल्या मोजणी व झोनींग मध्ये स्पष्टपणे माझ्या जागेत रस्ता नसल्याचे दाखवले आहे. तरी देखील कर विभागाकडून कर लावला जात नाही याउलट विविध खात्यांचे अहवाल व प्रस्ताव मागवण्यात आले असल्याचे कारण देत दिरंगाई केली जात आहे.

See also  वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी - वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील