औंध: शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच श्री. शिवाजी विद्या मंदिर, औंध, पुणे-०७ इयत्ता १० वी १९९९-२००० च्या बॅचचे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने रविवार, दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी एकत्र आले होते. २५ वर्षांनी जुने सवंगडी पुन्हा भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि पुन्हा सर्व जण शोळेतील वर्गात रमून गेले. शाळेच्या प्रांगणात स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी शिक्षकांचाही सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात आले. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
शरद नवगिरे,विनायक चोरघे , विकास जुनवणे , अमर करमाळकर, रुपाली वैरागर इत्यादी अनेक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच अनेक माजी शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले.
प्रशालेच्या उपप्राचार्या सौ चंदनशिवे मॅडम आणि पर्यवेक्षिका सोनवणे मॅडम यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी मेळावा पार पडला.
विद्यार्थ्यांनी 25000/-रू धनादेश शाळेसाठी मदत उपप्राचार्या चंदनशिवे मॅडम यांच्याकडे सुपूर्द केला. प्रशालेच्यावतीने उपप्राचार्यांनी माजी विद्यार्थ्यांना अनेक आशीर्वाद व धन्यवाद दिले. आपल्या शैक्षणिक कालखंडात मिळालेल्या उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे आज १९९९-२००० बॅच चे विद्यार्थी शासकीय तथा खाजगी अशा विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. काही जण यशस्वी उद्योजक देखील आहेत.
मराठी माध्यमाच्या शाळेतील घटत चाललेल्या पट संख्ये बद्दल माजी विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली तसेच येणार्या पिढीने मराठी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य द्यावे व मराठी शाळेत शिक्षण घ्यावे अशी आशा व्यक्त केली.