पुणे दि १ मे – ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या’ औचित्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे’ च्या वतीने देशभक्त केशवराव जेधे यांचे प्रतिमेस – पुतळ्यास काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे हस्ते पुष्पहार व अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले की, १८ पगड जातींना सोबत घेऊन, रयतेच्या राज्याची स्थापना शिव छत्रपतींनी केली. त्यात ज्या सरदार कान्हाोजी जेधेंचे योगदान लाभले, त्यांचेच वंशज केशवरावजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे संस्थापक अध्यक्ष झाले. स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त व तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केशवरावजी जेधे यांनी समाजात स्त्री शिक्षणा बाबत देखील महात्मा फुलेंच्या संस्कारांचा वारसा देखील पुढे नेला.
लोकमान्य टिळकांचे नंतर पुणे शहरातील काँग्रेसचे नेतृत्व त्यांनीच केले. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या तोंडावर ते अनंतात विलीन झाल्याची खंत व उणीव स्व. यशवंतरावजी सह राज्यातील समस्त काँग्रेस जनांना वाटली. रयतेच्या राज्याची संकल्पनाच् ‘भारतीय संविधानात’ दडलेली असून त्याची पुरेपूर अंमलबजावणी हीच खरे केशवराव जेधें सह संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समस्त हुतात्म्यांना आदरांजली ठरेल.. असे उद्गार ही या प्रसंगी गोपाळदादा तिवारी यांनी काढले.
स्वागत प्रास्ताविक अ भा मराठा महासंघ,अध्यक्ष पुणे शहराचे, युवराज दिसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन तानाजी शिरोळे यांनी केले.. या प्रसंगी सचिन वडघुले, राकेश गायकवाड, गणेश मापारी, अनिकेत भगत, अतिश शेडगे, ज्ञानेश्वर कापसे, सुभाष जेधे,संजय अभंग, गणेश शिंदे, गणेश मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.