तापमान वाढवणारे सर्वत्र सिमेंट रस्तेच का?

दीपक श्रोते :रस्ता 2 किमी, खर्च 11.92 कोटी म्हणजे 1 किमी सिमेंट रस्त्याला जवळपास 6 कोटी. राष्ट्रीय महामार्ग (एक्सप्रेस वे) असेल तर चार पदरीला प्रति किमी खर्च 14 कोटी तर सहा पदारीला 20 कोटी.

म्हणूनच तर डांबरी रस्ते न करता सरसकट मोठे, छोटे, गल्लीबोळात तापमान वाढवणारे सिमेंट रस्त्याचे सगळीकडे स्तोम माजलेले दिसते का?

तोच रस्ता सिमेंट ऐवजी डांबरी केला तर प्रति 1 किलोमीटर रस्त्याला खर्च आहे फक्त 27 लाख. आपण  50 लाख समजू. म्हणजे सिमेंट रस्त्याला 10 ते 20 पट खर्च आहे.

सिमेंट रस्त्याबद्दल दावा केला जातो की हा एक वेळचा खर्च आहे पुढील 20 ते 30 वर्ष हे रस्ते टिकणार आहेत. पण खरच प्रत्यक्षात हे असे आहे का? तीस वर्ष टीकण्याचा दावा करणारे रस्ते कुठे 5 वर्षात, कुठे 3 तर कुठे एक वर्षाच्या आतच खराब झालेले, त्यांना भेगा पडलेल्या दिसत आहे. मग काही ठिकाणी डांबर टाकून भेगा बुजवण्याचे काम होताना दिसते. तरी जे फाटले ते फाटले ते काही दुरुस्त/पूर्ववत होताना दिसत नाही. म्हणजे दीर्घकाळ टिकणारे, देखभाल खर्च न लागणारे दावे इथे फोल होताना सर्रास सर्वत्र आपल्याला दिसत आहे.


तरी तापमान वाढवणाऱ्या सिमेंट रस्त्याचा अट्टाहास का?
डांबरी रस्ते का नाही?
डांबरी रस्ते जास्त काळ टिकत नाही त्याचा दर दोन तीन वर्षाला देखभाल खर्च होतो हा दावा पुण्यातील डेक्कन परिसरातील जंगली महाराज रस्त्याला लागू होत नाही. 50 वर्षे झाली तरी हा डांबरी रस्ता सुस्थितीत आहे.

काही ठिकाणी नागरिकांनी डांबरी रस्त्याची मागणी करूनही गल्लीबोळात सुद्धा सिमेंट रोडच माथी मारल्या जातात. म्हणजे आमचेच (नागरिकांचेच) प्रचंड पैसे खर्च करून सोबतीला तापमान वाढवणारे, आरोग्य बिघडवणारे, भूजल पातळीला संपवणारे रस्ते का? रस्त्याची उंची वाढल्यामुळे लोकांच्या घरात, दुकानात पाणी शिरते ती समस्या तर वेगळीच.

एक्सप्रेसवे कराना सिमेंटचे पण शहरातील सरसगट सर्वच सिमेंट रस्ते का?
म्हणजे एकीकडे जागतिक तापमान वाढ, हवामान बदल यावर भाष्य करायचे, ते नियंत्रणात आणण्यासाठी  चर्चासत्र भरवायची, परिषदा घ्यायच्या, सरकारने लोकांना सहयोग द्या म्हणून आवाहन करायचे आणि प्रत्यक्षात कृती वेगळीच.त्यामुळे ही सारासार हुकूमशाही, कायदेशीर लूट व भ्रष्टाचाराचे कुरण तर नाही ? ही शंका आल्यावाचून राहत नाही.

               

See also  खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ