पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. गौरी गजानन पाटील यांनी व्हिएतनाम येथे १२ व १३ जून २०२५ रोजी झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा विज्ञान परिषद २०२५’ मध्ये भारताचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. “तंत्रज्ञान, शाश्वतता आणि क्रीडामधील सर्वांगीण आरोग्य” या मुख्य विषयाभोवती केंद्रित असलेल्या या परिषदेत जगभरातील नामवंत तज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ एकत्र आले होते.
या प्रतिष्ठित व्यासपीठावर डॉ. गौरी पाटील यांनी “व्यावसायीकरणाच्या माध्यमातून भारताच्या क्रीडा अर्थव्यवस्थेतील वाढीमध्ये आयपीएल क्रिकेटची भूमिका” या विषयावर सखोल आणि अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला. त्यांच्या अभ्यासास सर्वत्र भरभरून दाद मिळाली. त्यांनी आपल्या सादरीकरणात इंडियन प्रीमियर लीग (आय पी एल) कशा प्रकारे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा उभारणी, पर्यटनवाढ, युवकांचा सहभाग आणि संलग्न क्षेत्रांतील संधी निर्माण करून देशाच्या आर्थिक वाढीचा वाहक ठरत आहे, हे प्रभावीपणे मांडले. तसेच, आयपीएलच्या प्रेरणेने कबड्डी, फुटबॉल आणि हॉकीसारख्या अन्य क्रीडा प्रकारांतही व्यावसायिक लीगची निर्मिती होऊन भारतात बहुक्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याचे त्यांनी विशद केले.
या आंतरराष्ट्रीय गौरवामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन, उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार, उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे यांचे सहकार्य, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सामूहिक सहकार्य महत्त्वाचे ठरले. त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सादरीकरण शक्य झाले.
या यशामध्ये भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे दूरदर्शी नेतृत्व देखील महत्त्वाचे ठरते. भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. विश्वजीत कदम यांनी नेहमीच आंतरराष्ट्रीय संपर्क, संशोधन आणि अध्यापन सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम यांचे मार्गदर्शन हे संस्थेच्या शिक्षण व सांस्कृतिक परंपरेचा मूलाधार आहे.
मा. डॉ. अस्मिता जगताप, कार्यकारी संचालिका, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेस, पुणे यांनी आरोग्य जागरूकता, क्रीडा विकास आणि सर्वांगीण शिक्षण यामध्ये समन्वय साधण्यात मोलाचे योगदान दिले. मा. विजयमालाजी कदम, अध्यक्षा, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती, यांनी मुलांमध्ये क्रीडाप्रेम व शिस्त जोपासण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. मा. डॉ. के. डी. जाधव, सहकार्यवाह भारती विद्यापीठ, यांनी संशोधन व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागासाठी पाठबळ देऊन अशा उपक्रमांना बळकटी दिली.
डॉ. गौरी पाटील यांचा हा जागतिक स्तरावरील सन्मान केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब आहे. त्यांनी सादर केलेला शोधनिबंध क्रीडा विज्ञान, आर्थिक धोरण आणि राष्ट्रीय प्रगती यामधील परस्परसंबंध अधोरेखित करतो.
ही उल्लेखनीय कामगिरी भारती विद्यापीठाच्या क्रीडा, संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षणातील सातत्यपूर्ण प्रयत्नांना साजेशी आहे. संस्था भविष्यातही अशाच जागतिक दर्जाच्या नेतृत्व व नवोपक्रमाला प्रेरणा देत राहील.
घर साहित्य/शैक्षणिक भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जागतिक क्रीडा मंचावर ठसा : डॉ. गौरी...