पुणे : पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री निवडुंगा विठोबा मंदिर, नाना पेठ येथे ‘आरोग्य वारी” चे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील व महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पालखी सोहळा २०२५ निमित्त, महापालिका सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत श्री निवडुंगा विठोबा मंदिर, नाना पेठ परिसरात महिला आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा “आरोग्य वारी कार्यक्रम” मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणारा हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री. चंद्रकांत पाटील, संदीप कदम उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन कार्यालय, सुनील बल्लाळ उप आयुक्त परिमंडळ क्र. ५. मा. श्री किसन दगडखैर सहायक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रिय कार्य, जोशी प्रांत अधिकारी, मा. श्रीमती वसुंधरा पाटील वैद्यकीय अधिकारी, इनामदार मुख्य आरोग्य निरीक्षक, तसेच उप प्रमुख आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचारी व सेवाभावी संस्था हे उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलांसाठी वैद्यकीय तपासण्या, आरोग्य विषयक मार्गदर्शन, पोषण आणि मासिक पाळी स्वच्छता यांसारख्या महत्वाच्या विषयांवर माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या आरोग्यासंदर्भातील उपक्रमांचे कौतुक केले व भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबवण्याचे आश्वासन दिले.