पुणे: “शिक्षण, सक्षमीकरण आणि उन्नती” या मूल्यांचा दीप प्रज्वलित करत, भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय परिषद ‘आय.सी.आर.टी.एस.टी.एम.-२०२५’ म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील अलीकडील प्रवाहांवरील आंतरराष्ट्रीय परिषद ही दोन दिवसांची शैक्षणिक पर्वणी ३० जून आणि १ जुलै २०२५ रोजी अत्यंत उत्साही आणि यशस्वी वातावरणात पार पडली.
या परिषदेला भारतासह ऑस्ट्रेलिया, इजिप्त, ओमान, इंडोनेशिया, नायजेरिया, इराक, मलेशिया, जपान, तुर्कस्तान, फिलिपाइन्स, अमेरिका आणि व्हिएतनाम अशा १३ देशांमधून आलेल्या ८१ संघांनी सहभाग नोंदवला. भारतातील २० राज्यांतील २९ विद्यापीठे आणि ६३ महाविद्यालयांतील प्रतिनिधींनी आपले संशोधन सादर केले. एकूण १७७ शोधनिबंध सादर झाले असून ही संख्या संस्थेच्या शैक्षणिक विश्वासार्हतेचे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रभावी उदाहरण ठरली.
या परिषदेचा उद्घाटन सोहळा प्रेरणादायी ठरला. प्रा. डॉ. पराग कालकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या गुणवत्ता-केंद्रित प्रगतीचे मनापासून कौतुक करत बहुविषयक संशोधनाची गरज अधोरेखित केली. डॉ. अस्मिता जगताप, कार्यकारी संचालिका, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन, यांनी विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि नेतृत्वगुणांची जोपासना आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. के. डी. जाधव, सहकार्यवाह, भारती विद्यापीठ, पुणे, यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. प्रा. डॉ. एम. एस. सागरे, सहकार्यवाह, भारती विद्यापीठ, यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्तेच्या वाटचालीचे कौतुक केले आणि पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. अस्मिता मुरार, उपाध्यक्षा, ईवाय-पार्थेनॉन यांनी उद्योग आणि शिक्षण यामधील दुवा बळकट करण्यावर भर देत कौशल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेच्या आयोजनाचे नेतृत्व प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी सक्षमपणे केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले, “रौप्य महोत्सव म्हणजे केवळ स्मरणांचा उत्सव नाही, तर नवसंभावनांची दिशा आहे. आमचं प्रत्येक पाऊल नव्या शिखरांकडे ठामपणे उचलत आहोत.” महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा देताना प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी नमूद केले की, यावर्षी प्रथम वर्ष प्रवेशक्षमता ४२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रणाधारित शिक्षण विषयात नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. संगणक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागास पीएच.डी. संशोधन केंद्र म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाने नॅक च्या दुसऱ्या फेरीत ‘अ’ श्रेणी मिळवत गुणवत्ता अधोरेखित केली आहे.
सह-संयोजिका प्रा. डॉ. व्ही. आर. पवार आणि प्रा. डॉ. के. ए. माळगी यांनी यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले, त्यांनी परिषदेच्या व्यवस्थापनात अत्यंत अचूक आणि उत्तम समन्वय दाखवला. उपप्राचार्या प्रा. डॉ. एस. एस. चोरगे आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एम. पवार यावेळी उपस्थित होते.
परिषदेच्या समारोप सत्रात देश-विदेशातील प्रतिनिधींनी उत्कृष्ट आयोजनाचे, संशोधन सादरीकरणाच्या दर्जाचे आणि संस्थेच्या आतिथ्यशीलतेचे भरभरून कौतुक केले. या परिषदेतील तांत्रिक सत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत तंत्रज्ञान, डेटा सायन्स, डिजिटलीकरण आणि व्यवस्थापनातील नवकल्पना यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली. अनुभवी की-नोट वक्त्यांनी आणि सत्राध्यक्षांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. देश-विदेशातील संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांच्या विचारांनी सभागृहे वैचारिक ऊर्जेने भरून गेली होती.
‘आय.सी.आर.टी.एस.टी.एम.-२०२५’ ही परिषद केवळ एक शैक्षणिक मंच नव्हती, तर ती मा. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या दूरदृष्टीची साक्ष होती. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन महाविद्यालय भविष्यातही अशाच दर्जेदार आंतरराष्ट्रीय उपक्रमांची योजना करण्यासाठी कटिबद्ध आहोत.