मुळा-मुठा नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊनच पूर्ण करणार – खासदार मुरलीधर मोहोळ

पुणे : मुळा-मुठा नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊनच पूर्ण करणार असे प्रतिपादन खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.मुळा-मुठा नदीकाठ सुधार आणि नदी पुनरुज्जीवन या दोन प्रकल्पांसंदर्भात PARK (Policy Advocacy Research Centre) या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या संवाद सत्रात सहभागी होत या दोन्ही प्रकल्पांची सर्वांगीण चर्चा केली. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या या संवादात पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम, मुख्य अभियंता श्री. प्रशांत वाघमारे, या प्रकल्पांशी संबंधित विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. महेश पोहनेरकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर नदीप्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञांचे, शासकीय अधिकाऱ्यांचे आणि नागरिक प्रतिनिधींचे दोन्ही प्रकल्पांसंदर्भात सादरीकरण झाले. डॉ. मन्वी सिंह आणि डॉ. अमृता जोगळेकर यांनी मांडलेली नागरिकांची बाजू, तसेच पूर व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था, पर्यावरणपूरक वृक्षलागवड, वॉटर रिटेन्शन आणि SCADA प्रणालीसारख्या तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाली.

पुण्यातील तज्ज्ञांची आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका लक्षात घेऊनच हे दोन्ही प्रकल्प पुढे नेले जाणार आहेत. प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन नदीकाठ सुधार आणि नदी पुनरुज्जीवन या प्रकल्पांचा सर्वांगीण विचार केला, तर पर्यावरण आणि विकास यामध्ये योग्य समतोल साधता येईल. मुळा-मुठा नदीकाठ सुधार आणि पुनरुज्जीवन हे प्रकल्प केवळ एक अभियांत्रिकी उपक्रम नसून, पुण्याच्या पर्यावरणीय भवितव्याशी जोडलेला आहे.

या प्रकल्पातील अडचणी, नागरिकांच्या समस्या आणि पर्यावरणपूरक उपाययोजना यांचे तंत्रशुद्ध नियोजन करून नदीला तिचे पूर्वीचे रुप मिळवून देणे, हे निश्चितच आमचे कर्तव्य आहे, अशी भूमिका खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी मांडली.

See also  कुंडमळा पुलासाठी आठ कोटी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर ठेंगा! या घटनेला जबाबदार युती सरकारच - आम आदमी पार्टीचा आरोप