पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या

पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे  निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा, प्रस्तावित नवीन कामांचा, अपघातप्रवण ठिकाणी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत माहिती पालकमंत्री यांनी जाणून घेतली. जुना पुणे मुंबई रस्त्याचा विकास, प्रस्तावित कात्रज कोंढवा रस्ता, गंगाधाम चौक येथे उड्डाणपूल, खराडी मधील पूल व रस्ते विकास, बालभारती पौड फाटा प्रस्तावित रस्ता तसेच शिवणे खराडी रस्ता याबाबत माहिती घेऊन या प्रकल्पांमधील अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

शहरातील ६ पॅकेजेसमध्ये १०६ रस्ते दुरुस्तीची सुमारे ३३० कोटी रुपयांची कामे सुरू आहे. याव्यतिरिक्त पॅकेजेसमध्ये समाविष्ट नसलेल्या रस्त्यांवर विविध यंत्रणांकडून सुरू असलेल्या खोदाईबाबत कालमर्यादा घालून त्यानुसार रस्ते दुरुस्तीचे नियोजन करावे. रस्त्यांच्या दुरुस्ती, खोदाईबाबत त्या भागातील नागरिकांना माहिती होण्यासाठी लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामांची माहिती दिली, पुणे शहरात नव्याने समाविष्ट २३ गावातील २७३ कि.मी. रस्त्यांचा महानगरपालिका हद्दीत समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत ९४४ कि.मी. डांबरी, सिमेंटचे २१० कि.मी. तसेच अन्य रस्ते मिळून एकूण १ हजार ४०० कि.मी. चे रस्ते आहेत. त्यादृष्टीने शहरात रस्ते दुरुस्तीचे नियोजन करण्यात येत आहे. रस्त्यांचे अपूर्ण कामे पूर्ण करुन मिसींग लिंक जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अपघात प्रवण ठिकाणांची माहिती वाहतूक विभागाने दिली असून त्यानुसार मनपा आणि वाहतूक विभागाच्या समन्वयाने उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  आम आदमी पार्टी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या मैदानात

आंबिल ओढा आणि सिंहगड रोड वरील नाला कल्व्हर्टमुळे पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहतूक विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.पाटील यांनी वाहतूक पोलीस विभागाला दिले.