आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी आणि देहू येथून प्रस्थान होत असून त्यासाठी वारकरी दाखल झाले आहेत. आळंदी व देहूनगरीत आलेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले असून अनेक सोयी-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन दिल्या आहेत.

वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. आळंदी नगर परिषदेने विकेंद्रित पद्धतीने ५ टँकर भरण्याच्या ठिकाणांची व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा व कर्मचारी २४x७ असावेत अशा सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या आहेत. वारी कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी एकूण २२ टँकर्स तैनात ठेवण्यात आले आहेत. जलशुद्धीकण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती, टीसीएल पावडर इत्यादी तयारीही पूर्ण झाली आहे. शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाईप लाईन टाकून काम करुन घेण्यात आले आहे.

पालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील मंदिर व इंद्रायणी घाट परिसरातील तसेच इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचे एकूण १७ हायमास्ट दिवे सुरु केले आहेत. शहरातील मोबाईल टॉयलेट यांना विद्युत व्यवस्था करून देण्यात आली आहे. रस्त्यावरील दिवाबत्तीची दुरुस्ती करण्यात आली असून पाणी पुरवठा केंद्र याठिकाणी २५० के. व्ही.ए. क्षमतेच्या जनरेटरची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आली आहे.

आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन, रस्ते स्वच्छता, औषध फवारणी, धूर फवारणी कामे तीन पाळ्यांमध्ये करण्यात येणार असून नगरपरिषदेच्या १२ घंटागाड्या, ३ कॉम्पॅक्टर,५ टॅक्टर, सक्शन मशीन आदी वाहनांसह साधारण १०० सफाई कर्मचारी २४x७ तैनात असणार आहेत. वारी संपल्यानंतरच्या स्वच्छतेबाबतचे नियोजन देखील प्रशासनाने केले आहे.

२ हजार ८०० स्वच्छतागृह उपलब्ध
आळंदीतील नगरपरिषद मालकीचे सर्व ३५६ सार्वजनिक शौचालये, सुलभ शौचालयाच्या एकूण ४९० सह, १५०० मोबाईल टॉयलेट्स तर देहू गावात ८६४ स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शहरात संसर्गजन्य रोग पसरू नये यासाठी शहरात नियमितपणे जंतू नाशक फवारणी व धूर फवारणी केली जात आहे.

See also  जिल्ह्यात १४ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

सीसीटीव्हीची करडी नजर
नगर परिषदेमार्फत आळंदी गावात सर्व महत्वाच्या ठिकाणी एकूण १३० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ मोठ्या स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. चोरीच्या घटना रोखण्यात व इतर तपासात पोलीस यंत्रणेला याची मदत होणार आहे.

देहू-आळंदी येथील पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले असून
वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर व सर्व महत्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेमार्फत काढून घेण्यात आले आहेत.

देहू नगर पंचायतीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन
वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे नगरपालिकेच्या कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन आला असून तेथील संपर्क क्रमांक ८८०५४१२१०९ व ९६०४४१२१०९ असा आहे.

देहू नगरपंचायत कडून पब्लिक ऍड्रेस सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामुळे वृद्ध वारकरी व लहान मुले हरवल्यास सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीच्या (पीएससी) माध्यमातून व्यक्ती सापडण्यास मदत होणार आहे. आपत्कालीन परिस्थिती अथवा इतर काही सूचना असल्यास एकाच वेळेस मिळणार आहे. पोलीस प्रशासनाला व इतरांना काही सूचना द्यायची असल्यास पीएससी यंत्रणेमुळे मदत होणार आहे

दोन्ही नगरपालिका प्रशासनाने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पूर्ण केले असून घाटावर एनडीआरएफचे आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात ठेवले आहे. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.