पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील तीन विद्यार्थिनी कु. श्रद्धा निर्मळ, कु. सौंदर्या जाधव आणि कु. साक्षी खामकर यांना आयईईई डब्ल्यूआयई (IEEE Women in Engineering – WIE) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित शिष्यवृत्तीचा सन्मान प्राप्त झाला आहे.
क्वेस्ट ग्लोबल, इंडिया यांच्या सौजन्याने दिली जाणारी ही शिष्यवृत्ती विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय शैक्षणिक प्रगतीची, तांत्रिक कौशल्यांची आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची अधिकृत पावती आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत प्रत्येकीस उच्च कार्यक्षमतेचे लॅपटॉप प्रदान करण्यात आले.
प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करताना सांगितले,“हे यश त्यांच्या मेहनतीचे फलित आहेच, पण त्या ज्या आत्मविश्वासाने आणि प्रगल्भतेने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत, ही संपूर्ण महाविद्यालयासाठी गौरवाची बाब आहे.”
या यशामध्ये प्रा. किरण नाईकवाडी आणि श्री. अमोल नलवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, याचीही त्यांनी विशेष नोंद घेतली. डॉ. अश्पना दिलावर यांच्या हस्ते लॅपटॉप वाटपाचा समारंभ उत्साहात पार पडला.
या घडामोडीकडे एक सकारात्मक दिशादर्शक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे, विशेषतः माननीय कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह मा. डॉ. विश्वजीत कदम, तसेच कार्यकारी संचालिका मा. डॉ. अस्मिता जगताप यांचे सततचे सहकार्य, प्रोत्साहन आणि महिलांच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतचा दृष्टिकोन यामुळेच असे उपक्रम यशस्वीरीत्या राबवणे शक्य झाले आहे.
या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रात महिलांना सक्षम बनवण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी मिळाली आहे. नवप्रवर्तन, शैक्षणिक उत्कृष्टता आणि समाजोपयोगी शिक्षण या मूल्यांना पुढे नेण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.