महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारी – मुख्यमंत्री शिंदे

नागपूर : महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारी आहे. विधानपरिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे केले.

विधानपरिषद सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद सदस्य, ज्येष्ठ पत्रकार आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्याला महर्षी कर्वे, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची ही परंपरा जपण्याचे काम विधानपरिषदेच्या माध्यमातून होत आहे. विधानपरिषदेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

See also  भागवत धर्माची पताका उंचावण्याचे काम पत्रकारांनी केले : भैय्यासाहेब पाटील