जी२० सदस्यांनी घेतला कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद; परिषदेच्या ठिकाणी प्रक्रियाकृत भरडधान्य उत्पादनांचेही प्रदर्शन

मुंबई : मुंबईत सध्या सुरू असलेल्या जी 20 परिषदेच्या कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या विदेशातील सदस्यांनी कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद घेतला. केंद्र शासनाचे कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणामार्फत (एपीडा) परिषदेच्या ठिकाणी हापूस आंब्याची माहिती देणारा स्टॉल लावण्यात आला असून देश -विदेशातील सहभागीदार हापूसची चव चाखून त्याचे कौतुक करत आहेत.

मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रुझ येथील हॉटेल ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता देश-विदेशातील प्रतिनिधी सहभागी आहेत.

याचबरोबर आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणामार्फत या ठिकाणी विशेष स्टॉल लावण्यात आला आहे. भरडधान्यांवर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेली विविध उत्पादने येथे मांडण्यात आली असून देश-विदेशातील सहभागीदार याची माहिती घेत आहेत.

एपीडाचे उप महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे म्हणाले की, कृषी उत्पादनांवर प्रक्रिया आणि त्याच्या निर्यातीला प्राधिकरणामार्फत मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. प्रक्रिया केलेल्या भरडधान्यांवरील विविध उत्पादनांना स्टॉलच्या माध्यमातून जी २० परिषदेच्या बैठकीत चालना देण्यात येत आहे.

हापूस आंब्याचे प्रदर्शन करणारे केबी कंपनीचे सहायक व्यवस्थापक भाविक कारीया म्हणाले की, आंब्याला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आंब्याच्या निर्यातीला शासनामार्फत मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पिकणारा हापूस आंबा जगभरात लोकप्रिय आहे. जी 20 परिषदेमध्ये स्टॉल लावल्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

See also  खराडीतील मे.विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्या Yashwin Orizzonte  या बांधकामास  3 कोटी 10 लाख दंड रयत स्वाभिमानी संघटनेच्या मागणीला यश