भारती विद्यापीठात “शुभारंभ” उत्साहात

पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी आयोजित सात दिवसांचा स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रम “शुभारंभ” अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास जागवणे, सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे आणि त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाला योग्य दिशा देणे हा होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांच्या बीजभाषणाने झाले. त्यांनी विद्यार्थिनींना संबोधताना म्हटले, “शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून, स्वप्नांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य आहे.”

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. महंतेश हिरेमठ, आयआयटी तिरुपतीचे डॉ. ममिल्ला रविशंकर, डॉ. दयानंद बिलगी, डॉ. संदीप वानखेडे, श्री. समीर वाघ, श्री. अमोल जाधव, श्री. अविक चॅटर्जी आणि श्री. मनीष मेहता यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानांमध्ये तंत्रज्ञानातील नवकल्पना, आजीवन शिक्षणाची गरज, जबाबदार अभियंता घडविण्याचे महत्त्व आणि नेतृत्वगुण यावर विशेष भर देण्यात आला.

विद्यार्थिनींनी भारती विद्यापीठाच्या समृद्ध परंपरेची ओळख करून घेतली. गोल्डन जुबली संग्रहालयाला दिलेल्या भेटीत प्रा. डॉ. वीरधवल घोरपडे यांनी संस्थापक डॉ. पतंगरावजी कदम यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याची माहिती दिली. विद्यार्थिनींनी या कार्याचा गौरव अनुभवला आणि विद्यापीठाचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला.

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या विशेष सत्रात ध्यान, मनःशांती आणि संतुलित जीवनशैलीबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रा. डॉ. सुवर्णा चोरगे आणि प्रा. डॉ. स्मिता जाधव यांनी लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम, झिरो टॉलरन्स धोरण आणि सुरक्षित कार्यसंस्कृती याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

आरोग्यविषयक सत्रांमध्ये मानसिक स्वास्थ्य, स्वच्छता आणि होमिओपॅथी बाबत तज्ज्ञांनी उपयुक्त माहिती दिली. याशिवाय विद्यार्थिनींसाठी “कॅटलिस्ट शिष्यवृत्ती योजना” सादर करण्यात आली, ज्यामुळे त्यांना शैक्षणिक व करिअरविषयक संधींबाबत दिशा मिळाली.

नेतृत्वगुण व संघभावना विकसित करण्यासाठी प्रा. प्रनोती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र पार पडले, ज्यामुले विद्यार्थिनींमध्ये जबाबदारीची जाणीव आणि एकत्रित कार्यसंस्कृती अधिक दृढ झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात उपप्राचार्य प्रा. डॉ. अविनाश पवार, उपप्राचार्या प्रा. डॉ. सुवर्णा चोरगे तसेच समन्वयक प्रा. डॉ. स्मिता जाधव, प्रा. दीक्षा चोपडे, प्रा. डॉ. महारुद्र कापसे, प्रा. संदीप चिनके आणि प्रथम वर्षाच्या सर्व शिक्षकांचा मौल्यवान सहभाग होता.

“शुभारंभ” कार्यक्रमाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित न ठेवता विद्यार्थिनींमध्ये नवचैतन्य, उमेद आणि प्रेरणा जागवली. या कार्यक्रमातून त्या आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासासाठी अधिक आत्मविश्वासाने सज्ज झाल्या आहेत.

See also  स्वातंत्र्यदिनी इंदू साकारणार 'भारतमाता'