कात्रज : देश घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या तरुण पिढीला अमली पदार्थांच्या राक्षसाने घातलेला विळखा ही अतिशय गंभीर गोष्ट असून पूर्वी तरुणाई मध्ये सुरू होत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनांनी आता शालेय वयात प्रवेश केला आहे. अतिशय काळजी करण्याची गोष्ट आहे. याला आळा घालण्यासाठी शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क मोहिमेचे समन्वयक, समुपदेशक प्रा. डॉ.मिलिंद भोई यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स,भोई प्रतिष्ठान पुणे आणि युनिक इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यामाने “से नो टू ड्रग्स” या विषयावर आयोजित व्याख्यान सत्रात प्रा. डॉ. मिलिंद भोई बोलत होते. ते पुढे म्हणाले की लहान वयातच अमली पदार्थांची सुरुवात शारीरिक ,मानसिक , भावनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून याचे वाढत चालले प्रमाण या कडे आपण सर्वांनी एक राष्ट्रीय समस्या म्हणून पाहणे गरजेचे आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क मोहिमेचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री प्रवीण पाटील, युनिक शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. ए आर. मुलाणी , प्राचार्य सौ.जयश्री जाधव ,उपप्राचार्य सौ सुनीता चांदगुडे, पर्यवेक्षक सौ. नफीसा कोतवाल, अमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समुपदेशक श्री शुभम मेदनकर ,श्री गणेश शिंदे, सौ संगीता रुद्राप ,श्री लखन वाघमारे, दिशा दोरुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या व्याख्यानसत्रात अमली पदार्थ चे दुष्परिणाम विषयी चित्रफीत याप्रसंगी सादर करण्यात आली. यानिमित्ताने या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. मिलिंद भोई यांच्याशी विविध प्रश्न विचारून स्नेहसंवाद साधला. महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क मोहिमेचे पोलीस उप महानिरीक्षक श्री प्रवीण पाटील यांनी या प्रकल्पाची माहिती देताना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा विभाग या ज्वलंतविषयावर प्रभावीपणे कार्यरत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचे जनजागृतीचे उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी दिली.
युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक प्रा. डॉ.आर.ए.मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या गेलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी होऊन या विरोधात कार्यरत राहण्याची शपथ याप्रसंगी घेतली.