संदीप वाडेकर, खडकवासला : रस्त्यावरील अनधिकृत कमान आणि फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत असले तरी त्यातून मिळणाऱ्या मलिद्यामुळे महानगरपालिकेचा अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभाग कारवाई करण्याऐवजी आखडता हात घेत आहे. फ्लेक्स काढल्यानंतर पुढच्या तयारीसाठी अनधिकृत फ्लेक्स साठी उभारण्यात आलेले पहाड आणि कमान तसेच ठेवण्यात आले आहेत. मांडववाले, राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे घडणाऱ्या या दिखाऊ प्रकारावर आयुक्त काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दसरा झाल्यानंतर आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरभर आणि उपनगरांत कारवाई मोहीम राबवून फ्लेक्स काढले. यापुढे अनधिकृतपणे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले. परंतु, ही कारवाई दिखाऊ असल्याचे उघड झाले आहे. कारवाईमध्ये आखडता हात घेत दुजाभाव केला जात असल्याचे मनसेचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विजय मते यांनी सांगितले. बेकायदा फ्लेक्स काढून ते अतिक्रमण विभागाचा गाडीमध्ये टाकण्यात आले. परंतु हे फ्लेक्स उभारलेल्या लोखंडी आणि लाकडी पहाड, कमान मात्र जागेवरच ठेवून पुढच्या तयारीसाठी मांडववाल्यांना परत देण्याची मेहेरनजर दाखवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.सणाचे दिवस असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली जात आहे. शहरात गुरुवारी साजरा झालेल्या दसरा सणानिमित्त शुभेच्छा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन, धम्मचक्र प्रवर्तनदिन, वाढदिवस, विविध प्रकारच्या खरेदींवर सवलती असे मोठ्या प्रमाणात शहरभर फ्लेक्स उभारण्यात आले होते.
सौरभ मते (माजी सरपंच खडकवासला) :शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्स आणि कमानीमुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. अशा अनधिकृत फ्लेक्स आणि कमानींवर कोणत्याही दबावाला बळी न पडता महानगरपालिकेने वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे.
गजानन नवघणे,(आकाशचिन्ह परवाना निरीक्षक)
नवरात्रातील देवदेवतांच्या सणामुळे आणि दसऱ्यामुळे लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून फ्लेक्स आणि कमानींवर कारवाई करण्यात आली नव्हती. परंतु दसऱ्यानंतर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून मंडपवाल्यांनी फ्लेक्स साठी उभारलेल्या कमान यांनी पहाड काढले नसल्यास महानगरपालिका त्यावर कारवाई करेल.