पुणे : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची विशेष जबाबदारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सोपविली आहे.
पक्ष संघटना मजबुतीसाठी महानगरपालिका क्षेत्रात विशेष प्रकल्पांतर्गत आवश्यक त्या उपाययोजना सुचवाव्यात आणि त्या अमलात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करावी. जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून महापालिका क्षेत्रातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक संपूर्ण माहिती घ्यावी, असे पक्षाने मोहन जोशी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दीर्घ राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क साधण्याची हातोटी मोहन जोशी यांच्याकडे असल्याने ते, ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतील, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात आणि देशात १२ राज्यात प्रभारी म्हणून माजी आमदार मोहन जोशी यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने मोहन जोशी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. पक्ष संघटनेत प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश शहर काँग्रेस उपाध्यक्ष अशी पदे सांभाळल्यामुळे त्यांना संघटनेतील कामांचा दांडगा अनुभव आहे.
























