केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची मेधा कुलकर्णी यांच्या घरी सदिच्छा भेट

कोथरूड : चांदणी चौकाच्या पुलाच्या उद्घाटनाच्या दरम्यान भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी आमदार असताना चांदणी चौक पुला संदर्भात पाठपुरावा करत असल्याचे भाषणादरम्यान सांगितले.

कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरी सदिच्छा भेट देत घरातीलसदस्य व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या निर्णयानुसार आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कट करून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर आमदार मेधा कुलकर्णी यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी सातत्याने पक्षांतर्गत प्रयत्न होत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळाले. अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या पदाधिकारी असूनही त्यांचा नाम उल्लेख टाळण्यात आला होता.

चांदणी चौकाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा अंतर्गत असलेली ही खेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नाराजी नंतर उघडपणे राजकीय पटलावर आली.

या पार्श्वभूमीवर चांदणी चौकातील कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांचा आवर्जून केलेला उल्लेख व त्यानंतर त्यांच्या घरी चहापाण्याच्या निमित्ताने घेतलेली भेट यामुळे भविष्यात कोथरूडच्या राजकारणामध्ये नव्याने काही समीकरणे मांडली जाणार का? की माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पुणे शहराच्या राजकारणामध्ये प्रभाव अधिक वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

See also  सकल मराठा समाज नवी- सदाशिव पेठ कडून पुणे येथे एक दिवसीय साखळी उपोषण