प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा झटका; माजी नगरसेविका रोहिणी चिमटे यांचा भाजपा प्रवेश

पुणे : माजी नगरसेविका रोहिणी सुधीर चिमटे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. यामुळे सूस बाणेर पाषाण प्रभाग क्रमांक 9 मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

पाषाण सुतारवाडी परिसरामध्ये दहा वर्ष नगरसेविका राहिलेल्या रोहिणी चिमटे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मागील 2017 च्या निवडणुकीमध्ये रोहिणी चिमटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिली नव्हती. यावेळी रोहिणी चिमटे यांनी अपक्ष निवडणूक लढवत 6256 मतदान घेत आपले ताकद दर्शवली होती.

यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या बाणेर पाषाण सुतारवाडी सुसरोड सोमेश्वर वाडी परिसरामध्ये कार्यरत होत्या. पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर रोहिणी चिमटे यांचा प्रवेश भाजपात होणार असे निश्चित मानले जात होते. या अनुषंगाने रोहिणी चिमटे यांचा भाजपा प्रवेश झाल्याने भारतीय जनता पार्टीची प्रभाग नऊ मधील राजकीय स्थिती अधिक भक्कम झाली असून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार ,शिवसेना, मनसे एकत्रीत अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अनुसूचित जमातीसाठी आता नव्याने तयारी करावी लागणार असून या जागेसाठी नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत. प्रभाग क्रमांक नऊच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपाला होत असलेला फायदा पाहता उमेदवारी मिळवण्याची स्पर्धा अधिक रंगताना पाहायला मिळणार आहे.

See also  महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारी - मुख्यमंत्री शिंदे