गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

कोथरूड : पूर्वीच्या काळी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी आजीच्या गोष्टी हे अतिशय महत्त्वाचं माध्यम होतं. पण कालांतराने त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सकारात्मक बाबी गोष्टींच्या माध्यमातून सांगून, संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.

नामदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये आईची गोष्ट ऐकायला आणि संस्काराचे मोती या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी स्पर्धेच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अयक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस अनुराधा एडके, मिताली सावळेकर,माजी नगरसेविका डॉ.‌श्रद्धा प्रभुणे पाठक, सौ.वासंती जाधव,सौ. हर्षाली माथवड, पर्यवेक्षिका मोनिका जोशी , डॉ.केशव क्षीरसागर, मनिष तथा बंटीशेट निकुडे, गणेश भोसले, राज तांबोळी, नवनाथ जाधव, योगेश राजापूरकर, शंतनू खिलारे, रामदास गावडे, आकाश कातुरे,सौ.कल्याणी खर्डेकर, सौ.प्रणेती लवंगे,प्रतीक खर्डेकर, सतीश कोंडाळकर, दत्तात्रय देशपांडे,यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लहान मुलांवर उत्तम संस्कार होत होते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजी किंवा आजोबा लहान मुलांवर गोष्टींच्या माध्यमातून चांगले संस्कार करायचे. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे प्रमाण घटले आहे. आता ही जबाबदारी आईंवर आली आहे. त्यामुळे सकारात्मक बाबी गोष्टींच्या माध्यमातून सांगून, संस्कारक्षम पिढी निर्माण करणे आणि समाजातील वाईट प्रवृत्ती मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,‌ लहान मुलांसाठी उन्हाळ्यात मामाच्या गावाला जाणं हा वेगळाच आनंदाचा विषय असतो. याकाळात मुलांना आपले छंद मनसोक्तपणे पूर्ण करता येतात. सहलींसोबत भारतीय मैदानी खेळ कमी झाल्यामुळे, मामाच्या गावाला जाऊया उपक्रम कोल्हापूरला सुरू केला. तसाच उपक्रम पुण्यातही सुरू करणार आहे. या माध्यमातून मुलांमध्ये सहलीच्या माध्यमातून आसपासच्या परिसराविषयी माहिती देणं आणि भारतीय मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश आहे.

See also  राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठीगुणात्मक सुधारणा करावी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका मंजुश्री खर्डेकर यांनी केले. त्या म्हणाल्या की, माननीय चंद्रकांतदादांचे कार्य म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असते. त्यामुळे माननीय दादा असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित असतात. नवीन पिढी संस्कारक्षम होण्यासाठी लहान मुलांना गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असे सांगतानाच स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व ही अभिनव स्पर्धा आयोजित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आम्हाला मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी ह्या उपक्रमाची मोठीच मदत झाल्याची भावना ही अनेक मातांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केल्याचे अनुभव ही मंजुश्री खर्डेकर यांनी कथन केले.कानडी महिलेने मोडक्या तोडक्या मराठीत कथा सांगण्याचे धाडस असेल किंवा हिंदीत गोष्ट सांगणारी आई, मावळ्याच्या वेशात जीवा महाले यांची कथा सांगणारी आई असेल किंवा दर आठवड्याला मुलांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यात यावा असे सांगणाऱ्या माता सर्वांचे अनुभव समृद्ध करणारे होते असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. स्पर्धेचे परीक्षण मोनिका जोशी आणि स्वप्ना शिर्के यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले.
प्रथम पुरस्कार 25000 रोख व मानपत्र सौ. मनीषा गढरी यांना , द्वितीय पुरस्कार 15000 रुपये व मानपत्र प्रीती लांडे यांना संस्कारांचे मोती ह्या गोष्टी साठी तर तृतीय पुरस्कार नम्रता पाटील यांना शूर शिवराय या कथेसाठी रुपये 10000 रोख व मानपत्र,तसेच उत्तेजनार्थ प्रथम प्रिया लांजेवार , द्वितीय पुरस्कार अनघा दीक्षित यांना रुपये 2000/ देण्यात आले.तसेच अंतिम फेरीतील सर्व स्पर्धक भगिनींना 1000 रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले.