प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठतेने कार्य केल्यास आपोआपच भारतमातेची सेवा घडते – अविनाश धर्माधिकारी

पुणे – ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले, त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात कुठेही गेल्यानंतर त्याने सातत्याने आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करत करावे. प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठतेने कार्य केल्यास आपोआपच भारतमातेची सेवा घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला देश घडवण्याच्या कार्यासाठी तयार करावे, असे प्रेरणादायी उदगार चाणक्य मंडलचे संस्थापक तथा माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.

दि पुणे पोस्ट अँड टेलिकाॅम को-ऑप. क्रेडीट सोसायटी पुणे या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेची लेक प्रमाणपत्रांचे वाटप प्रसंगी धर्माधिकारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीएसएनएलचे पीजीएम अनिल धानोरकर, पुणे रिजनचे पीएमजी रामचंद्र जायभाये, पुणे रिजनच्या डीपीएस सीमरन कौर, माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तुपे, सन्मान्य चिटणीस गणेश भोज, कार्यलक्षी संचालक नागेश नलावडे, तज्ञ संचालक दीपक धुमाळ, व्यवस्थापक राजन कामठे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने व पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची औपचारिक सुरवात करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना धर्माधिकारी म्हणाले की, आपल्याला मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांनी कधीही हुरळून जाऊन नये. तसेच डोक्यात अंहकार जाऊ देऊ नये. कारण अहंकार हे मानवाच्या अधःपतनाचे मुख्य कारण आहे. तसेच एक यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी थांबू नये, तर त्यापेक्षाही जास्त यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. जीवनात कुठेही जा परंतु आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करा आणि देशनिर्माणाच्या कार्यासाठी स्वतःला तयार करा. विद्यार्थ्यांनी स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्यदेखील जपणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यायाम, योगा, प्राणायामासारखे उपाय करा. यातूनच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.
या प्रसंगी बोलताना वालगुडे यांनी संस्थेच्या गेल्या १०२ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला व संस्थेच्या वतीने सभासदांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमात इतर संचालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी दहावी, बारावी, पदवी-पदव्युत्तर तसेच उच्चशिक्षण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसाचे वितरण करण्यात आले. पुरस्कार स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या कार्यक्रमादरम्यान अभिमान महाराष्ट्राचा श्री शैलेश लोखंडे यांचा अत्यंत आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील विविध लोककला, जसे की लावणे, शाहिरी, गोंधळ अशा विविध कलाप्रकारांचे उत्तम सादरी करण्यात आले. या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

See also  बालगंधर्व रंगमंदिराच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन