औंध मध्ये भाजपाच्या‘नव्या चेहऱ्यांचा प्रयोग’ने जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी कोणाला अडचणीत आणणार?

औंध : निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलेल्या नवख्या उमेदवारामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ८ ब मधील भाजप उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवरील अनुभवी उमेदवारासमोर अचानक समोर आलेल्या या नव्या चेहऱ्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक प्रभागांमध्ये उलटफेर पाहायला मिळाले होते. त्या निवडणुकीत भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रकाश ढोरे आणि अर्चना मुसळे यांचे यंदा तिकीट कापण्यात आले. त्यांच्या जागी इतर पक्षांतून आयात केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याने भाजपमधील पारंपरिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

प्रभाग क्रमांक ८ ब मध्ये भाजपकडून भक्ती अजित गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्या पूर्णपणे नवख्या असल्याने परिसरातील मतदारांपर्यंत त्यांचे नाव अद्याप प्रभावीपणे पोहोचलेले नाही. अचानक राजकीय प्रवेश झाल्याने त्यांची ओळख, काम आणि भूमिका याबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. यामुळे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवताना भाजपा कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पौर्णिमा बाळासाहेब रानवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून औंध-बोपोडी परिसरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. औंध विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले असून स्थानिक प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यामुळे या प्रभागात केवळ कमळ चिन्ह पाहून मतदार मतदान करणार की उमेदवाराचा अनुभव आणि कामगिरी पाहून निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी सामाजिक आणि प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर राष्ट्रवादीच्या पौर्णिमा रानवडे यांचे पारडे जड दिसून येत आहे. भाजपच्या नवख्या उमेदवारासमोर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

एकूणच प्रभाग ८ ब मधील ही लढत अनुभवी स्थानिक नेतृत्व विरुद्ध आयात नवखा चेहरा अशी ठरत असून निकालात मोठी रंगत पाहायला मिळणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

See also  नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर - धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन