पालकांमध्ये उत्साह; मनसेच्या मयूर सुतार यांच्या उमेदवारीला पाषाण सुतारवाडी–सोमेश्वरवाडी परिसरातून वाढता पाठिंबा

पाषाण : गेल्या पंधरा वर्षांपासून स्कूल बस व्यवसायाच्या माध्यमातून सुस रोड, सुतारवाडी, सुसगाव, बाणेर, बालेवाडी, माळुंगे, पाषाण आणि सोमेश्वरवाडी या परिसरातील प्रत्येक सोसायटीशी थेट संपर्क असलेले मयूर सुतार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परिसरातील पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या माध्यमातून नागरिकांशी निर्माण झालेला विश्वास आणि दैनंदिन संपर्क याचा थेट फायदा मयूर सुतार यांच्या प्रचाराला होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः पालकवर्गामध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून “आपल्यातलाच उमेदवार” अशी भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, मागील आठ वर्षांपासून सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पाषाण आणि सुस रोड परिसरातील नागरिकांकडे स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याची नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे. ही नाराजी मयूर सुतार यांच्या पथ्यावर पडताना दिसत असून, प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

विशेष म्हणजे, सुतारवाडी–सोमेश्वरवाडी–पाषाण या भागातून ड गटामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव उमेदवार म्हणून मयूर सुतार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे मतांचे विभाजन टळून त्यांना थेट लाभ होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रश्नांची जाण, नागरिकांशी थेट संवाद आणि दीर्घकाळचा सामाजिक संपर्क या त्रिसूत्रीच्या बळावर मयूर सुतार यांची उमेदवारी प्रभागात लक्षवेधी ठरत आहे.

See also  निलंबित आर्मी कर्नलवर सहकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; अद्याप अटक नाही