भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘द पॉवर ऑफ माईंडफुलनेस’वर प्रेरणादायी व्याख्यान

पुणे : भारती विद्यापीठाचे संस्थापक माननीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारती विद्यापीठाचे कार्यवाह माननीय डॉ. विश्वजित कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाची सुरुवात एका अर्थपूर्ण आणि उपयुक्त उपक्रमाने करण्यात आली. या निमित्ताने भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ‘द पॉवर ऑफ माईंडफुलनेस’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, माननीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सरस्वती वंदना व भारती गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. डॉ. केतकी माळगी यांनी केले. त्यांनी आजच्या तणावपूर्ण जीवनात सजगता आणि मानसिक संतुलनाचे महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी ॲरो इंटरनॅशनलच्या एच. आर. मॅनेजर तसेच क्लेअरमाइंडच्या संस्थापिका श्रीमती प्राजक्ता हर्डीकर या मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांची ओळख प्रा. पल्लवी नारखेडे यांनी करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप व्ही. जाधव यांच्या हस्ते श्रीमती हर्डीकर यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप व्ही. जाधव यांचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी व्हिएतनाममधील विद्यापीठाशी आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला असून ‘हायर एज्युकेशन लीडर ऑफ द इयर २०२५’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. तसेच भारती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची निवड झाली आहे. याच कार्यक्रमात कराटे स्पर्धेत तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर प्रथम क्रमांक तसेच राज्यस्तरावर कांस्य पदक मिळविल्याबद्दल इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी प्रियांका दत्तात्रय भेसके हिचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक प्रगतीसोबत मानसिक आरोग्य आणि शिस्त तितकीच महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. मुख्य वक्त्या श्रीमती प्राजक्ता हर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात मानसिक स्पष्टता, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक विचार यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व प्रभावी आणि संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडले.

See also  बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्रच्या वतीने पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न.-जेष्ठ कलावंतांना विमा पॉलिसी चे वाटप

उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रा. अश्विनी कानडे यांनी आभारप्रदर्शनाने केला. प्रा. प्रियंका रायकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली असून सेवा सप्ताहाची उत्साहवर्धक आणि सकारात्मक सुरुवात झाली.