प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पुणे महापालिकेकडून पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा ९ ऑगस्टपासून सर्व देशभर सुरू झाला असून, प्रत्येक पुणेकराने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आपल्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे महापालिकेकडून पालकमंत्री श्री. पाटील यांना आज राष्ट्रध्वज सुपूर्द करुन शहरात राष्ट्रध्वज वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त केदार वझे, आरोग्य निरीक्षक गणेश साठे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्र म्हणून एकत्रितपणे घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे हे राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल अभिमानाची भावना वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना प्रत्येक घरी आपला राष्ट्रध्वज उभारुन स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर गेल्यावर्षी प्रत्येक घरावर तिरंगा उभारला गेला. यंदा अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आहे. त्यामुळे सर्व देशवासीयांनी आपल्या घरी पुन्हा तिरंगा उभारुन राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

See also  मंदिरे ब्राह्मण मुक्त करण्याची वेळ आल्याचा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषाेत्तम खेडेकर