औंध, पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज औंध येथील कार्यालयात विशेष आढावा बैठक घेतली.
या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, तांत्रिक अडचणी तसेच कामाचा वेग याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी ‘पीआयटीसीएमआरएल’ (PITCMRL) कंपनीला स्पष्ट आणि कठोर निर्देश देण्यात आले.
डॉ. चौधरी यांनी कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना देत प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला. तसेच, अडथळे तातडीने दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या बैठकीस महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी तसेच दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मेट्रो लाईन ३ हा प्रकल्प पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर दरम्यान जलद व सुलभ प्रवासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे
























