पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त पुणे विभागातील पुणे, सातारा,सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.
प्रादेशिक कार्यालयात प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्ताहाचा शुभारंभ झाला. यावेळी सहायक संचालक (वित्त व लेखा) अनिल गिते , सहायक आयुक्त विशाल लोंढे, माधुरी वाघमोडे, ज्ञानेश्वर जावळे, समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सप्ताहाची माहिती देण्यासोबतच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.
या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक समता, महापुरुषांचे विचार आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. या सप्ताहाच्या नियोजनाबाबत पुणे विभागातील जिल्हा स्तरावर शहरी व ग्रामिण भागात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, व कोल्हापूर या कार्यालयाने आपापल्या कार्यक्षेत्रात जय्यत तयारी केली असून, या सात दिवसांत खालीलप्रमाणे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक ९ एप्रिल रोजी युवा संवाद कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालये व शासकीय वसतिगृहांमध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती आणि आंबेडकरी विचार या विषयांवर व्याख्याने व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १० एप्रिल रोजी योजना प्रबोधन कार्यक्रमाअंतर्गत समता दूतांमार्फत पथनाट्ये व लघुनाटिका सादर करून शासकीय योजनांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच ‘मार्जिन मनी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विविध गौरवपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दिनांक १२ एप्रिल रोजी संविधान जागर व महिला मेळाव्याअंतर्गत संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांवर व्याख्याने आयोजित केली असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष महिला मेळावा घेण्यात येणार आहे.
दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक मेळावा, रक्तदान शिबीर आणि स्वच्छता अभियानाद्वारे सामाजिक सेवेचे व्रत जोपासले जाईल. तसेच कोल्हापूर औद्योगिक संस्था मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली जाईल.
दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी केली जाणार असून व्याख्याने आणि चर्चासत्रांनंतर या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप होणार आहे.
























