पुणे : पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलीस पडताळणी प्रक्रियेला अधिक कार्यक्षम, वेगवान आणि पारदर्शक बनवण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण सत्राची सुरुवात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (भा.पो.से.) यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेतील अचूकता आणि वेळेचे महत्त्व अधोरेखित केले. या सत्रात पोलीस अधिकाऱ्यांना पासपोर्ट पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया, अलीकडील तांत्रिक सुधारणा तसेच वेळेत व अचूक अहवाल सादर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना पासपोर्ट सेवा अधिक तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक करण्यावर भर दिला. वेळेत आणि अचूक पोलीस पडताळणी ही केवळ पासपोर्ट वितरणासाठीच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. उप पासपोर्ट अधिकारी सौ. श्रुती पांडे यांनी पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP) आवृत्ती 2.0 विषयी सविस्तर माहिती दिली. या नव्या प्रणालीमुळे डिजिटल सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक झाली आहे. तसेच पोलीस विभागाशी अधिक प्रभावी समन्वय साधणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण सत्रादरम्यान प्रश्नोत्तर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी पडताळणी प्रक्रियेतील शंका, आवश्यक कागदपत्रे, सामान्य त्रुटी आणि अडचणी याबाबत मार्गदर्शन घेतले.या उपक्रमामुळे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार असून नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार पासपोर्ट सेवा देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

















