पुणे, प्रतिनिधी : बाणेर येथील ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरमध्ये येणाऱ्या एका महिलेवरील एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जागामालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला परिसरातील नागरिकांनी धाडसाने पकडून चतु:शृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले.
मृत व्यक्तीचे नाव घनश्याम संजय रायकर (वय ४९, रा. बाणेर) असे असून, आरोपीचे नाव सोलेमन शेंडो (वय ५२, रा. पिरंगुट) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम रायकर यांच्या मालकीच्या जागेत गेल्या २५ वर्षांपासून ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटर सुरू आहे. या सेंटरमध्ये येणाऱ्या एका महिलेवर आरोपी सोलेमन शेंडो याचे एकतर्फी प्रेम होते. गेल्या काही वर्षांपासून तो संबंधित महिलेला त्रास देत असल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी आरोपी चाकू घेऊन मेडिटेशन सेंटरमध्ये आला. त्यावेळी जागामालक घनश्याम रायकर यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने रायकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि चतु:शृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले. बाणेर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
बाणेर सारखा उच्चभ्रू वस्तीमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बाणेर बालेवाडी पाषाण मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची संख्या वाढली असल्याने याबाबत पोलिसांमार्फत गुन्हेगारांवर कडक शासन करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
















