जिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावा

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू येथून निघणाऱ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी, आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच सासवड येथून प्रस्थान करणाऱ्या संत सोपानदेव पालखी सोहळ्यांच्या मार्गावरील रस्ते,मुक्कामस्थळे व सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज आढावा घेतला. वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी कितपत झाली याचाही सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील ईनामदार वाडा परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील खराब रस्त्याची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत, कॅन्टोन्मेंट बोर्डाची नाहरकत घेऊन तातडीने करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. आकुर्डी येथील पालखी मुक्कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे तसेच तेथील रस्ता व मेट्रोची कामे पालखी आगमनापूर्वी पूर्ण होतील याची खात्री करण्यासही सांगण्यात आले.

लोणी काळभोर येथील पालखी मुक्कामाची तयारी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असून, जर्मन हँगर, पाणी टँकर व स्वच्छता व्यवस्था गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालखी तळावरील व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे पार पाडावी, असेही निर्देश देण्यात आले.

निरा नदीत पालखी आगमनाच्या दोन दिवस आधी पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या. संत सोपानदेव पालखी सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्त, पाणीपुरवठा व स्वच्छता यांचे अधिक नियोजनबद्ध नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. आळंदी येथे नवीन भक्ती सोपान पुलाची उंची ‘स्काय वॉक’प्रमाणे वाढविणे तसेच दर्शन बारीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आळंदी ते पिंपरी-चिंचवड हद्दीपर्यंतच्या सुमारे ७०० मीटर रस्त्यापैकी केवळ १०० मीटरचे रुंदीकरणाचे काम शिल्लक असून ते लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली.

दिवे घाट परिसरात वारीदरम्यान बॅरेकेटिंग व रस्त्यालगत विजेची सोय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज संस्थानांना प्रत्येकी एक स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आळंदी येथील दर्शनबारी परिसरात सुरक्षिततेसाठी सुमारे १८० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

See also  राष्ट्रघडणीतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे- नवल किशोर राम

सासवड येथील भुजबळ हॉटेल परिसरातील खड्डा भरण्याचे काम प्रगतिपथावर असून ते लवकर पूर्ण होणार असल्याने पालखी मार्ग सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. पालखी मार्गावरील सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापनासाठी समन्वय साधण्यासाठी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, “पालखी सोहळा हा जगातील सर्वात शिस्तबद्ध धार्मिक सोहळा असून रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना उत्तम सुविधा द्याव्यात.”

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, संबंधित नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच देहू, आळंदी व संत सोपानदेव संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.