मानवी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पशुवैद्यकांनी जबाबदारी घ्यावी –  डॉ. भिलेगावकर

पुणे – देशाच्या एकूण जीव्हीए सकल मूल्यवर्धनात आज जी वाढ झाली आहे त्यामध्ये पशुवैद्यकांचे मोठे योगदान आहे. येणाऱ्या काळात एकूणच मानवी आरोग्य जपण्यासाठी वन हेल्थ संकल्पनेत पशुवैद्यकांना मोठी जबाबदारी पेलावी लागेल. वाढते तापमान वाढत चाललेले प्राणीजन्य आजार यांचे निदान व उपचार वेळेत करून त्याचा प्रादुर्भाव मानवात होणार नाही यासाठी पशुसंवर्धन विभाग पर्यायाने पशुवैद्यकांना मोठे योगदान द्यावे लागेल असे प्रतिपादन डॉ. किरण भिलेगावकर प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रादेशिक केंद्र प्रभारी भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्था पुणे यांनी केले. ते जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त आयोजित तांत्रिक चर्चासत्रात बोलत होते.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना शाखा पुणे व ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे विशेष तांत्रिक चर्चासत्र आयोजित केले होते.  सदर चर्चा सत्रात डॉ. सत्यवृत कुलकर्णी, औषध व खाद्य सल्लागार पुणे यांनी येणाऱ्या काळात प्राणिजन्य उत्पादने व मानवी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पशुवैद्यकांनी अन्नसुरक्षे बाबत घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर विवेचन केले. सोबत डॉ. कृष्णा मेथेकर, भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे पश्चिम विभाग प्रमुख यांनी एफएसएसआय संस्था करत असलेल्या कामाबाबत व त्या माध्यमातून होऊ घातलेले बदल कसे फायदेशीर ठरत आहेत व त्यामध्ये असणारे पशुवैद्यकाचे योगदान सविस्तरपणे मांडले. डॉ. कुलकर्णी व डॉ. मेथे हे पशुवैद्यक असल्याने त्यांचे जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त यतोचित सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाव्हेट पुणे  यांच्यामार्फत देखील जिल्ह्यातील उत्कृष्ट पशुवैद्यकांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शितलकुमार मुकणे, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी देखील पशुवैद्यकांनी समाजाच्या आरोग्याची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असे आवाहन केले. डॉ. रमेश वझरकर अध्यक्ष, जेष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान पुणे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी, जेष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारणी सदस्य व सभासद तसेच डॉ. देवेंद्र जाधव सह आयुक्त पशुसंवर्धन व डॉ. शैलेश केंडे सह आयुक्त पशुसंवर्धन पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे हे उपस्थित होते.

See also  सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य डॉ. सुनील राऊतमारे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्यासह महाव्हेट च्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्यंकटराव घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ऋषिकेश शिंदे अध्यक्ष, महाव्हेट पुणे यांनी केले.