बहि:शाल शिक्षण मंडळ केंद्र आयोजित एकदिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये उत्साहात संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ आणि कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि  विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बहि:शाल ‘कौशल्य विकास’ (स्किल्स डेव्हलपमेंट) कार्यशाळेचे आयोजन नुकतेच पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्देश उद्देश विद्यार्थ्यांचे  संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगारक्षमतेतील कौशल्यविकास करणे हा होता. या

कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांनी आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी  वेगवेगळी व्यावसायिक कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपण ही कार्यशाळा आयोजित करत असल्याचा त्यांनी सांगितलं.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहि:शाल विभागाचे महाविद्यालयीन कार्यवाह प्रा.बी. आर. घोडके यांनी केले. व्यावसायिक दृष्टीने आवश्यक असणाऱ्या कौशल्यांना आत्मसात करून त्याचं व्यवस्थापन करणे हे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचा त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटलं.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटी लोणी काळभोर येथील प्रा. डॉ. नंदकुमार शिंदे यांनी ‘व्यावसायिक कौशल्य विकास’ या विषयावर गुंफले. आपल्या सादरीकरणामध्ये कौशल्यांवर आधारित अनेक विनोदांची पेरण त्यांनी केली. व्यावसायिक कौशल्य विकासावर आधारित असलेले हे व्याख्यान अतिशय श्रवणीय झाले.

या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प समर्थ अभियांत्रिकी  महाविद्यालय बेल्हे येथील प्रा. डॉ. रुस्तुम दराडे यांनी ‘कौशल्य विकास’ या विषयावर गुंफले. डॉ. रुस्तुम दराडे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात संवाद कौशल्य, संघभावना, नेतृत्व, वेळ व्यवस्थापन आणि भावनिक बुद्धिमत्ता यांसारख्या सॉफ्ट स्किल्सचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.आपल्या मार्गदर्शन सत्रादरम्यान त्यांनी मौखिक, अमौखिक आणि लेखी संवादाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांचा शैक्षणिक तसेच व्यावसायिक जीवनातील उपयोग स्पष्ट केला. तसेच, देहबोली (बॉडी लँग्वेज) ,  दृष्टी संपर्क ( आय कॉन्टॅक्ट ) आणि प्रभावी लेखन कौशल्य मुलाखती व सादरीकरणांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास आणि चांगली छाप निर्माण करण्यास कसे मदत करतात हे त्यांनी स्पष्ट केले.

See also  मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर, दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

या कार्यशाळेचे तिसरे पुष्प मॉडर्न महाविद्यालय  शिवाजीनगर पुणे येथील प्रा.डॉ. संदीप सानप यांनी गुंफले.आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या लेखनप्रकारांची ओळख करून दिली. नोटीस लेखनाचे उद्दिष्ट, स्वरूप आणि आवश्यक घटक, तसेच मीटिंग अजेंडा आणि मीटिंग मिनट्स तयार करताना आवश्यक असलेली माहिती व त्याचे महत्त्व आदींविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. यासोबतच, औपचारिक व अनौपचारिक पत्रलेखन, ई-मेल लेखन आणि ब्लॉग लेखन यांचे स्वरूप, भाषा, शैली आणि आधुनिक संवादातील त्यांचे वाढते महत्त्व यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.डॉ. सानप यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी संवादासाठी स्पष्ट, संक्षिप्त आणि सुबोध लेखनाची आवश्यकता अधोरेखित केली. आधुनिक डिजिटल युगात ई-मेल आणि ब्लॉग लेखनाचे महत्त्व वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी योग्य लेखनशैली आत्मसात करावी, असे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विविध लेखनप्रकारांविषयी शंका विचारून संवाद साधला.

या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प नसरापूर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रोहिदास ढाकणे यांनी ‘ मुलाखत तयारी आणि मुलाखत कौशल्य ‘ या विषयावर  गुंफले. हे सत्र अत्यंत आकर्षक आणि माहितीपूर्ण होते. डॉ.ढाकणे यांनी आपल्या मार्गदर्शन व्याख्यानामध्ये मुलाखत तयारी, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या आवश्यक पैलूंवर लक्ष केंद्रित केले गेले. डॉ. ढाकणे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये  सिव्हिल सर्व्हिसेस, कॉर्पोरेट सेटिंग्ज, क्रिकेट आणि सिनेमातील वास्तविक उदाहरणांचा प्रभावीपणे वापर करून सत्र परस्परसंवादी आणि विषय संकल्पना संबंधित बनवले. त्यांच्या व्यावहारिक यू, विनोदबुद्धीने आणि  स्पष्टीकरणाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे  हे समजण्यास मदत झाली. एकंदरीत, व्याख्यान विद्यार्थ्यांकडून चांगले स्वीकारले गेले आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि रोजगारक्षमता कौशल्ये वाढविण्यासाठी फायदेशीर ठरले.

ही संपूर्ण कार्यशाळा अत्यंत संवादात्मक पद्धतीने पार पडली. ह्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध चर्चांमध्ये आणि उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे आणि केस स्टडीजमुळे या कार्यशाळेतील सर्वच सत्र अधिक रंजक आणि प्रभावी ठरली.या कार्यशाळेच्या आयोजनामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकार्यांची मदत लाभली. या कार्यशाळेमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.