मान्सूनपूर्व पाणीपुरवठा नियोजन आढावा बैठक : ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द – महापौरांचे निर्देश

पुणे : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी आज माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

बैठकीत शहरातील विद्यमान पाणीसाठा, जलशुद्धीकरण व्यवस्था, वितरण प्रणाली तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा होत असून, सध्याच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाणी गुणवत्तेबाबत पर्वती जलकेंद्र प्रयोगशाळेमध्ये दरमहा अनेक नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून, WHO व CPHEEO मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुणवत्ता राखली जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये क्लोरीनेशन प्रक्रिया सक्षम ठेवण्यात आली असून, आवश्यक रसायनांचा (PAC व क्लोरीन) पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

शहरातील १७ जलशुद्धीकरण प्रकल्पांची देखभाल, क्लेरीफायर व फिल्टर बेडची स्वच्छता तसेच यंत्रणांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. पावसाळ्यात वाढणाऱ्या गढूळपणाच्या पार्श्वभूमीवर पाणी शुद्धीकरण प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जुन्या हद्दीसोबतच नव्याने समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन, पाण्याच्या टाक्या व वितरण लाईन उभारण्यात येणार आहेत.तसेच, पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी AI आधारित लीक डिटेक्शन, रोबोटिक कॅमेरा तपासणी, वाहन ट्रॅकिंग प्रणाली व मोबाईल अ‍ॅपद्वारे नियंत्रण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

बैठकीत कनिष्ठ अभियंते, तांत्रिक कर्मचारी व मीटर रीडर्स यांच्या रिक्त पदांची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले की, ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द करून नागरिकांना अखंड, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करावा. तसेच सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी. आगामी मान्सून काळात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यावर विशेष भर देण्यात आला.

See also  ‘जीबीएस’ वर उपचारांविषयी सर्वंकष उपाययोजना करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर