कबड्डीतील महिला खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या सहकार्यवाह बाबुराव चांदेरे यांना बडतर्फ करण्याची खासदार गजानन कीर्तिकर यांची मागणी

मुंबई : राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झालेल्या महिला खेळाडूंना डावलण्याचे प्रकार घडत असून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांच्याकडून महिला खेळाडूंवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर यांनी लेखी पत्राद्वारे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्याकडे केली असून खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या बाबुराव चांदेरे यांना बडतर्फ करण्याची मागणी देखील गजानन कीर्तीकर यांनी केली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक २७ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान ७० वी वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवडचाचणी कबड्डी स्पर्धा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा २० महिलांचा प्राथमिक संघ निवड समिती सदस्यांमार्फत निवडण्यात आला होता.
महिला खेळाडूंचे शिबिर सध्या ठाणे येथे सुरु असून त्यात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह श्री. बाबुराव चांदेरे यांच्याकडून खेळाडूंवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत निवड झालेल्या काही खेळाडूंना जाणीवपूर्वक शिबिरासाठी निमंत्रित केले गेले नाही. तसेच ज्या महिला खेळाडू राज्य अजिंक्यपद स्पर्धा खेळल्या देखील नाही अशा खेळाडूंना मात्र शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. उपरोक्त स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या पुणे महिला संघाच्या खेळाडू अंकिता जगताप, पूजा शेलार, समृद्धी कोळेकर, पालघर संघाची खेळाडू पूजा पाटील, रत्नागिरी संघाची खेळाडू सिद्धी चाळके, मुंबई उपनगर संघाची सायली जाधव, धुळे संघाची खेळाडू ऋतुजा बोदिवडेकर आणि मुंबई शहर संघाची खेळाडू प्रतीक्षा तांडेल या खेळाडूंना शिबिरात श्री. चांदेरे यांनी सहभागी होण्यापासून रोखले आहे. यापैकी अंकिता जगताप ही खेळाडू आगामीकाळात छत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरू शकते.
राज्य अजिंक्यपद निवडचाचणीमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना डावलणे आणि निवड चाचणी न खेळलेल्या खेळाडूंना शिबिरासाठी निमंत्रित करणे म्हणजे निवड चाचणी स्पर्धा आयोजन आणि कबड्डी असोसिएशनची कार्यप्रणाली यांनाच आव्हान आहे. शिबिरासाठी खेळाडूंना बोलाविताना निवड समिती सदस्यांना देखील विश्वासात घेतले नसल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या
पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सदर महिला खेळाडूंवर झालेल्या अन्यायाचा प्रकार ही गंभीर बाब महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची बदनामी करणारी तर आहेच शिवाय श्री. चांदेरे यांच्या बेमुवर्तखोर वर्तनामुळे खेळाडूंचे व्यक्तिगत नुकसान करणारी आणि
महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अपमानजनक आहे. याप्रकरणी आपण व्यक्तीशः लक्ष घालून निवड समिती सदस्यांची तातडीने बैठक घ्यावी, सध्या सुरु असलेले शिबीर तात्काळ स्थगित करून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत निवडझालेल्या कबड्डी खेळाडूंना निमंत्रित करून पुन्हा शिबिराचे आयोजन करावे, आणि महाराष्ट्र राज्यकबड्डी असोसिएशनमध्ये वारंवार मनमानी कारभार करून खेळाडूंचे नुकसान करू पाहणाऱ्यासरकार्यवाह श्री. बाबुराव चांदेरे यांना बडतर्फ करावे असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर यांनी लेखी पत्रात म्हटले असून यावर कारवाई करण्याची मागणी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे. यावर अजित दादा पवार काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

See also  घरकाम करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या आयांचा आप तर्फे सत्कार