जागतिक योग दिनानिमित्त औंधमध्ये भव्य योग शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे, प्रतिनिधी : जागतिक योग दिनानिमित्त द औंध सोशल फाऊंडेशन आणि पतंजली परिवार, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने औंध परिसरात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाभ्यास केला.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका भक्ती गायकवाड, द औंध सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली.

योग प्रशिक्षक जयदीप बंदावणे, दीपा नारकर आणि हेमंत पांचाळ यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत योगाभ्यासाचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नगरसेविका सपना छाजेड, व्यावसायिक अजित गायकवाड, शिरीष नाईकरे तसेच द औंध सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले की, “सामाजिक समरसता आणि निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दिवसातील काही वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे. द औंध सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित होणारा योग दिन कार्यक्रम समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करत आहे.”

नगरसेविका भक्ती गायकवाड म्हणाल्या, “योग दिनानिमित्त जगभरात योगाभ्यास केला जात आहे. औंधमध्येही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून नागरिकांनी निरोगी जीवनासाठी योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे. द औंध सोशल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक होत आहे.”

जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या शिबिरात विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगासनांची प्रात्यक्षिके केली आणि निरोगी जीवनाचा संदेश दिला.

See also  पिंपरी चिंचवड महानगरपालिका विकासाच्या नावाखाली मुळानदी पात्रातील जैवविविधतेचा गळा घोटतेय