रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्ती कार्यअहवालाचे अनावरण; कसबा गणपती मंदिरात उत्साहात सोहळा संपन्न

पुणे, : “जय गणेश!”च्या मंगलमय घोषात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कार्यअहवालाचे अनावरण आज पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे दिमाखदार वातावरणात पार पडले. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते या विशेष कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

20 जून 2017 ते 20 जून 2026 असा दहा वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करणाऱ्या रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टने या दशकभरात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ही केवळ एका ढोल-ताशा पथकाची दशकपूर्ती नसून प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द, एकजूट आणि गणरायाच्या कृपाशीर्वादाची यशोगाथा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास आमदार हेमंत रासने यांच्यासह उत्तर मंडल अध्यक्ष अमित कंक, मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाच्या सचिव सौ. दीपा प्रशांत तावरे, श्री कसबा गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विनायक ठकार, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, विश्वस्त साई डोंगरे, विद्यमान नगरसेवक देवेंद्र (छोटू) वडके, शिवसाम्राज्य पथकाचे अध्यक्ष अक्षय बलकवडे, युवा वाद्यपथकाचे सर्वेसर्वा अॅड. अनिश पाडेकर, गणेश देशपांडे, श्रीराम पथकाचे अध्यक्ष विलास शिगवण, अतुल्य वाद्यपथकाचे अध्यक्ष अॅड. विपुल पांचाळ, उपाध्यक्ष सहेश आगरकर, कसब्याचा राजा जनार्दन पवळे संघाचे उत्सव प्रमुख राकेश डाखवे तसेच सामाजिक कार्यकर्ते पृथ्वी पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दशकपूर्ती निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या कार्यअहवालामध्ये ट्रस्टच्या गेल्या दहा वर्षांतील विविध उपक्रम, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जपणूक आणि भविष्यातील वाटचालीचा आढावा सादर करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी रुद्रांग वाद्यपथकाच्या कार्याचे कौतुक करत आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला पथकाचे पदाधिकारी, सदस्य, माजी सदस्य आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने रुद्रांग वाद्यपथकाच्या यशस्वी दशकपूर्तीला संस्मरणीय स्वरूप प्राप्त झाले.

See also  खडकी शिक्षण संस्था मध्ये पालखी सोहळा उत्साहात संपन्न!