पुणे, दि. १ जुलै : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ‘कृषी क्रांतीचे जनक’ स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर साजऱ्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र कृषी दिना’चा महायुती सरकारला विसर पडल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. पुण्यातील काँग्रेस भवन येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
गोपाळदादा तिवारी म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक हे संयुक्त महाराष्ट्राचे तिसरे आणि सलग ११ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले द्रष्टे नेतृत्व होते. आमदार किंवा पक्ष फोडाफोडी न करता लोकशाही मूल्यांच्या आधारे त्यांनी राज्याचे नेतृत्व केले. यवतमाळ जिल्ह्यातील गहुली गावातून बंजारा समाजातील नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या वसंतराव नाईक यांना काँग्रेसने संधी देत सामाजिक समानतेचा आदर्श निर्माण केला.
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हरितक्रांती, पंचायत राज व्यवस्था, सिंचन प्रकल्प, शेती विकास आणि ग्रामीण रोजगाराला मोठी चालना मिळाली. १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या काळात त्यांनी शेती उत्पादन वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. रोजगार हमी योजनेचा पाया रचत ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना दिलासा दिला. तसेच दुग्धोत्पादनाला चालना देत श्वेतक्रांती घडवून आणली आणि एमआयडीसीसारख्या संस्थांद्वारे औद्योगिकीकरणाला गती देऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या, असेही तिवारी यांनी नमूद केले.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे स्व. वसंतराव नाईक यांना सुमनांजली अर्पण करण्यात आली. राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे दिवस यावेत, अशी प्रार्थना करत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ‘महाराष्ट्र कृषी दिना’च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चवधरी, राजाभाऊ कदम, गुलामहुसेन खान, भगवान कडू, ऋग्वेदिता सपकाळ, दीपक ओव्हाळ, शबीर शेख, धनंजय पाटील, हरिदास आडसुळ, देविदास लोणकर, दादासाहेब कामठे, राजेंद्र पडवळ, रोहित साळवे, आबा तरवडे, धनंजय दाभाडे, ॲड. फैय्याज शेख, प्रवीण करपे, रवी आरडे, अमित कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















